संजय राऊत यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्याने वादग्रस्त प्रकरणाला पुन्हा उजाळा
By संजय पाठक | Published: June 2, 2023 03:55 PM2023-06-02T15:55:56+5:302023-06-02T15:56:29+5:30
मध्यंतरी घुसखोरीच्या प्रयत्नामुळे गाजले होते प्रकरण
नाशिक : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पाठ फिरत नाही तोच
उध्दव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज रात्री नाशिकमध्ये दाखल
होणार आहेत. विशेष म्हणजे ते उद्या (शनिवारी) त्र्यंबकेश्वर येथे भेट
देणार आहेत. मध्यंतरी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचा
आरोप करण्यात आला होता. त्यावरून खासदार संजय राऊत यांना भाजपाने
आव्हानदेखील दिले होते. त्यामुळे आता राऊत यांच्या त्र्यंबकेश्वर भेटीने
पुन्हा एकदा उजाळा मिळण्याची शक्यता आहे.
बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात
मध्यंतरी संदलची मिरवणूक सुरू असताना काही जणांनी घुसखोरी करण्याचा
प्रयत्न केला होता, मात्र, तो सुरक्षा रक्षकांनी रोखला असा आरोप आहे.
यानंतर राज्यभरात हे प्रकरण गाजले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
एसआयटी चौकशीची घोषणादेखील केली होती.
मात्र, संदलच्या दरम्यान मंदिराच्या प्रवेशव्दारावर धूप दाखवण्याची परंपरा असल्याचा दावा अनेकांनी केला आणि खासदार संजय राऊत यांनीदेखील तसेच म्हटले होते. त्यानंतर आचार्य तुषार भोसले आणि भाजप नेते नीतेश राणे यांनी संदलच्या दरम्यान धूप दाखवण्याची अशी कोणतीही परंपरा नव्हती आणि नाही. राऊत यांनी ही परंपरा होती ते सिध्द करून दाखवावे, असे आव्हान दिले होते. त्यामुळेच आज नाशिकला येऊन उद्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भेट देण्यामुळे या सर्व प्रकरणाला पुन्हा उजाळा मिळणार आहे.