संत निवृत्तीनाथांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:33+5:302021-07-07T04:18:33+5:30
वारकरी पंथाचे संस्थापक तथा माऊली ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू व गुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांनी ज्येष्ठ वद्य द्वादशी शके १२१९ ...
वारकरी पंथाचे संस्थापक तथा माऊली ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू व गुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांनी ज्येष्ठ वद्य द्वादशी शके १२१९ म्हणजे इसवी सन १२९७ या दिवशी जेथे योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला, त्या ब्रम्हगिरीच्या सान्निध्यात संजीवन समाधी घेतली. दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ मंदिरात नाथांचा संजीवन समाधी सोहळा नित्यनेमाने संपन्न केला जातो. आषाढी वारीसाठी दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करत असते. ज्येष्ठ वद्य द्वादशीला पालखी अहमदनगरला मुक्कामी असते, तेथेही समाधी सोहळा संपन्न होत असतो. मात्र याहीवर्षी कोरोनामुळे पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याने हा सोहळा नेहमीप्रमाणे येथे संपन्न झाला. यानिमित्त नाथांच्या संजीवन समाधीवर योगेश गोसावी, सच्चितानंद गोसावी यांनी पंचामृत आंबारसासह दुग्धाभिषेक करून षोडशोपचारे पूजा करण्यात आली.
यावेळी संस्थानचे प्रशासक तथा सहायक धर्मादाय आयुक्त कृष्णा सोनवणे, नगरपरिषद मुख्याधिकारी संजय जाधव, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, ॲड. भाऊसाहेब गंभीरे आदींनीही पूजेमध्ये सहभाग घेतला.
संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या समाधी प्रकरणातील अभंगाच्या साहाय्याने संजीवन समाधी कीर्तन निवृत्तीनाथांचे वंशपरंपरागत पुजारी ह.भ.प. जयंत महाराज गोसावी यांनी सांगितले. समाधीप्रसंग कथन करताना कीर्तनकारांसह वारकरी अतिशय भावूक बनले होते. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी तुलसीदल व फुलांची उधळण करीत संत निवृत्तीनाथांचा जयघोष केला. रश्मी गोसावी आणि ज्ञानेश्वरी गोसावी- धारणे यांनी समाधीस्थळाभोवती हळदी-कुंकवाचा सडा घातला.
त्र्यंबकेश्वरला श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली, तेव्हापासून दरवर्षी समाधी सोहळा साजरा होतो. या सोहळ्यास माजी विश्वस्त पुंडलिक थेटे, ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, योगेश गोसावी, महामंडलेश्वर ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवितकर, ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी, भानुदास महाराज गोसावी, अविनाश गोसावी, वेदमूर्ती सुरेश शिखरे, उल्हास धारणे, विजय धारणे यांच्यासह मानकरी व वारकरी उपस्थित होते.
फोटो - ०६ त्र्यंबक समाधी
060721\06nsk_44_06072021_13.jpg
संजीवन समाधी सोहळा