संजीवनी जाधवला कांस्यपदक
By admin | Published: June 16, 2014 12:39 AM2014-06-16T00:39:40+5:302014-06-16T01:03:14+5:30
संजीवनी जाधवला कांस्यपदक
नाशिक : तैवानमधील तैपई येथे सुरू असलेल्या १६व्या ज्युनिअर एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आज अखेरच्या दिवशी झालेल्या महिलांच्या ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधव हिने कांस्यपदक पटकावले. अंकतालिकेत भारत पाचव्या स्थानी राहिला असून, दोन सुवर्णपदकांसह १२ पदके पटकावली आहेत.
तैवानमधील तैपई येथे गेल्या १२ तारखेपासून १६वी ज्युनिअर एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०१४ स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेच्या आज अखेरच्या दिवशी महिलांची ३००० मीटर धावण्याची स्पर्धा झाली. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना नाशिकची संजीवनी जाधव हिने ९ मिनिटे ३५:०२ सेकंदाची वेळ नोंदवित कांस्यपदक पटकावले. या गटामध्ये कझाकिस्तानची बॅरिया मस्कोव्हा हिने ९ मिनिटे १६:२३ सेकंदाची वेळ नोंदवित सुवर्णपदक, तर जपानची इनामी सेकिने हिने ९ मिनिटे १७:५५ सेकंदाची वेळ नोंदवित रौप्यपदक पटकावले. सदर स्पर्धेमध्ये भारताने दोन सुवर्णपदकांसह १२ पदके पटकावित अंकतालिकेमध्ये पाचवे स्थान राखले आहे.
संजीवनी जाधव हिने स्पर्धेच्या ५००० मीटर धावण्याच्या गटातही सहभाग नोंदविला होता; परंतु ती पाचव्या स्थानी राहिली. यात तिने वैयक्तिक वेळेत सुधारणा मात्र केली. भारतामध्ये राष्ट्रीय स्पर्धेतील तिची १७ मिनिटे १०:०० सेकंदाची वेळ होती. येथे मात्र तिने १७ मिनिटे ००:२५ सेकंदाची वेळ देत वैयक्तिक कामगिरी नोंदविली. (प्रतिनिधी)