नाशिक विभागातील १९० शाळांनी गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:14 AM2019-05-29T01:14:16+5:302019-05-29T01:14:35+5:30
विभागातील तब्बल १९० शाळांमधील विविध शाखांमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अशाप्रकारे शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमध्ये नाशिकमधील सुमारे ८८ शाळांचा समावेश असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील नाशिकचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
नाशिक : विभागातील तब्बल १९० शाळांमधील विविध शाखांमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अशाप्रकारे शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमध्ये नाशिकमधील सुमारे ८८ शाळांचा समावेश असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील नाशिकचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राज्यस्तरीय निकालाच्या क्रमवारीत नाशिक विभाग सातव्या क्रमांकावर असला तरी नाशिक शहरासह विभागातील अनेक शाळांमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विभागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुन्हा एकदा दिसून आली आहे.
बारावीच्या निकालात शंभर टक्के निकाल लागलेल्या बहुतांश शाळांमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचाच बोलबाला असून, जवळपास दीडशेहून अधिक शाळांमध्ये विज्ञान शाखांचेच शंभर टक्के निकाल लागले आहेत, तर अन्य शाळांमध्ये कला अथवा वाणिज्य शाखांसोबत विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
स्वतंत्रपणे कला व वाणिज्य शाखांचा शंभर टक्के निकाल लागणाºया शाळांची संख्या मात्र अगदीच अल्पप्रमाणात असल्याचे २०१९च्या निकालातून समोर आले आहे. नाशिकमधून शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होणाºया शाळांमध्ये अशोक युनिर्व्हसल स्कूल अॅड ज्यु. कॉलेज, वडाळा व चांदशी या शाळांसह ग्लोबल इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अॅड ज्यु. कॉलेज, मातोश्री ज्युनियर कॉलेज, म्हसरूळ, परमानंद पाटील ज्युनियर कॉलेज, विस्डम स्कूल अॅड ज्यु. कॉलेज, स्वामी नारायण इंग्लिश मीडियम स्कूल अॅड ज्यु. कॉलेज, डॉ. एम. एस. गोसावी ज्यु. कॉलेज, बॉइज टाउन पब्लिक स्कूल अॅड ज्यु. कॉलेज, नूतन विद्यामंदिर अॅड ज्यु. कॉलेज देवळाली कॅम्प यांसह विविध महाविद्यालयांच्या ८४ शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नाशिक विभागातून सुमारे १०६ शाळांमध्ये शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेचा : सर्वाधिक निकाल
विभागात विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९४.०२ टक्के निकाला लागला आहे. विज्ञान शाखेतून ७६ हजार ६६२ पैकी ६३ हजार ६१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे, तर कला शाखेतून ६३ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ४६ हजार ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण सर्वांत कमी ७२.७४ टक्के आहे. वाणिज्य शाखेतून २२ हजार ६१२ पैकी २० हजार ४९६ म्हणजेच ९०.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यावसायिक अभ्यासक्रमातून चार हजार ६१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ७५.२८ टक्के आहे.