"फिल्टर"च्या पाण्याने माठावर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 06:19 PM2021-03-18T18:19:57+5:302021-03-18T18:21:02+5:30
चांदोरी : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थ बाटली बंद पाणी किंवा पिण्याच्या ...
चांदोरी : ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थ बाटली बंद पाणी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला महत्त्व देत आहे. पर्यायाने पारंपरिक माठ विक्री व्यवसायात मंदीचे सावट पसरले आहे. कमी पैशात सहजगत्या शुद्ध पाणी उपलब्ध होते, शिवाय थंड करण्यासाठी घरातील फ्रीज उपलब्ध असल्याने आज तरी मातीच्या माठाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने फिरत्या चाकावर माठ तयार केले जात होते. उन्हाळा आला की त्याची सर्वत्र विशेष मागणी असायची. आता दिवसाला केवळ ८ ते १० माठाची विक्री होत आहे. सध्या विविध इलेक्ट्रॉनिक कंपन्या सवलतीच्या दरात अनेक नवनविन उपकरणे उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांचा कल त्याआधुनिक वस्तूंकडे अधिक वाढत आहे. शिवाय ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या जारला मागणी वाढत आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पाण्याचे प्लांट सुरू झाल्याने नागरिकांचा कलही त्यांच्याकडे वाढला आहे.
१० रुपयात २० लिटर शुद्ध पाणी शुद्ध करून मिळते तसेच ती ही घरपोच सेवा असल्याने प्रत्येकाच्या घरात माठा ऐवजी जारच दिसत आहेत. पूर्वी १५० ते २०० रुपयांना मिळणारे माठ नागरिक दोन दोन वर्षे वापरत होते. मात्र सध्या रोजच्या पाण्यासाठी जास्त खर्च करण्याची तयारी दिसून येते. पर्यायाने माठाला मागणी काही प्रमाणात ओसरली आहे.
ग्रामीण भागात ही फिल्टर प्लांट सुरू झाल्याने नागरिक जारच्या पाण्याला महत्त्व देत असून अनेकांना रोजगार ही मिळाला आहे.
- निलेश कोटमे, संचालक वॉटर प्लॅन्ट, चांदोरी.