‘संक्रांत’ : नायलॉन मांजाने पाच वर्षीय बालिकेचा नाशिकमध्ये कापला गेला गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 08:54 PM2017-11-26T20:54:26+5:302017-11-26T20:59:08+5:30
नायलॉन मांजाच्या वापरामुळे लहान बालकांपासून तर प्रौढापर्यंत सर्वांनाच धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांवर तर वर्षभर या मांजारुपी जाळ्याची ‘संक्रांत’ कायम असते. मकरसंक्रांतीला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाही शहरासह विविध उपनगरांमध्येतरुणांकडून पतंगबाजी सुरू झाली आहे
नाशिक : आईसोबत दळण घेण्यासाठी संध्याकाळी बाहेर पडलेल्या एका बालिके चा गळा नायलॉन मांजाने कापला गेल्याची घटना रविवारी (दि.२६) सिडको परिसरात घडली.
सिडको भागातील गणेश चौकामध्ये राहणा-या पाटील कुंटुंबातील पाच वर्षाची कल्याणी ही आईसमवेत संध्याकाळी घराबाहेर पडली. यावेळी अचानकपणे पतंगचा मांजा तूटून खाली आला असता तीच्या गळ्याभोवती आवळला गेला. सदर मांजा नायलॉनचा असल्यामुळे कल्याणीच्या गळ्याला जखम झाली. सदर बाब सोबत असलेल्या आईच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ मांजा बाजूला काढला यामुळे अनर्थ टळला व जखम जास्त खोलवर झाली नाही. मात्र नायलॉन मांजाच्या वापरामुळे लहान बालकांपासून तर प्रौढापर्यंत सर्वांनाच धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांवर तर वर्षभर या मांजारुपी जाळ्याची ‘संक्रांत’ कायम असते. मकरसंक्रांतीला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाही शहरासह विविध उपनगरांमध्येतरुणांकडून पतंगबाजी सुरू झाली आहे. यावेळी पतंग कापली जाऊ नये म्हणून सर्रासपणे नायलॉन मांजा संबंधितांकडून वापरला जात असल्यामुळे दुर्घटनांना निमंत्रण मिळण्यास सुरूवात झाली आहे. शहरात नायलॉन मांजाने जखमी होण्याची पहिली घटना रविवारी गणेश चौकामध्ये घडली. नायलॉन मांजाच्या वापरावर आणि विक्रीवर बंदी असतानाही सर्रासपणे पतंग-मांजा विक्रीच्या दुकानांमधून मांजा लोकांच्या हाती पडत आहे. नागरिकांनी याबाबत जागरूकता दाखवून नायलॉन मांजा न वापरता पर्यावरणपुरक अशी सुरक्षित संक्रांत साजरी करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. नायलॉन मांजाला मागणी कमी झाल्यास आपोआप विक्रीदेखील बंद होईल, हे लक्षात घेता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नायलॉन मांजा हद्दपार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वनविभाग, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनासह पर्यावरणप्रेमी संघटनांनी केले आहे.