त्र्यंबकेश्वरला साकारणार सांस्कृतिक भवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:17 AM2021-08-29T04:17:12+5:302021-08-29T04:17:12+5:30
वर्षभरात होणार पूर्ण : आदिवासी वारकरी सांप्रदायाची जागा त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक-जव्हार मार्गावर रोकडा वसाहतीशेजारी आदिवासी वारकरी सांप्रदायाची जागा ...
वर्षभरात होणार पूर्ण : आदिवासी वारकरी सांप्रदायाची जागा
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक-जव्हार मार्गावर रोकडा वसाहतीशेजारी आदिवासी वारकरी सांप्रदायाची जागा असून संस्थेने याठिकाणी सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी सदर जागा बहाल केल्याने गुरुवारी (दि.२६) सांस्कृतिक भवनचा भूमिपूजन सोहळा आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते व तालुक्याचे ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, स्वामी सागरानंद आश्रमाचे स्वामी शंकरानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
त्र्यंबक-जव्हार रस्त्यावर असलेल्या रोकडेवाडीजवळ आदिवासी वारकरी सांप्रदायाची १० गुंठे जागा असून येथे दरवर्षी निवृत्तीनाथ महाराज यात्रेत वारकरी समाजबांधव मुक्कामाला असतात. या ठिकाणी संस्थेने सांस्कृतिक भवनसाठी आवश्यक जागा दिली असून आदिवासी उपयोजनेअंतर्गत आलेल्या निधीतून एक कोटी रुपये खर्चून सांस्कृतिक भवन उभारले जाणार आहे.
यापुर्वी आमदार निर्मला गावित यांच्या कार्यकाळात सापगाव येथे आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन उभारण्याची चर्चा झाली होती; परंतु नंतर ही चर्चा हवेत विरली. आता आमदार हिरामण खोसकर यांनी सांस्कृतिक भवनसाठी निधीची तरतूद केली असून कामाची निविदा प्रसिद्ध होऊन एजन्सीदेखील निश्चित झाली आहे. त्यामुळे लवकरच याठिकाणी सांस्कृतिक भवन साकार होणार आहे.
आदिवासीबांधवांच्या रुढीपरंपरा जपत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांना चालना देणे, समाजातील कवी, लेखक, साहित्यिक आदींना प्रोत्साहन देणे. पारंपरिक वाद्य, आदिवासी नृत्य आदींबाबत प्रशिक्षण व प्रबोधन करणे हा उद्देश हे सांस्कृतिक भवन बांधण्यामागे आहे. याशिवाय लग्नसोहळा, साखरपुडा, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यासाठीही याचा वापर केला जाणार आहे. वर्षभरात इमारत बांधकाम पूर्ण होईल, असे आमदार खोसकर यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते तथा नियोजन मंडळाचे सदस्य विनायक माळेकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विश्वनाथ कदम राजाभाऊ शिरसाट, जयराम मोंढे आदी उपस्थित होते.
फोटो- २७ त्र्यंबक भवन
त्र्यंबक-जव्हार मार्गावर सांस्कृतिक भवन उभारण्याच्या कामाचे भूमिपूजनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, संपतराव सकाळे, स्वामी शंकरानंद सरस्वती आदी.
270821\240327nsk_14_27082021_13.jpg
फोटो- २७ त्र्यंबक भवन त्र्यंबक-जव्हार मार्गावर सांस्कृतिक भवन उभारण्याच्या कामाचे भूमिपूजनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, संपतराव सकाळे, स्वामी शंकरानंद सरस्वती आदी.