ठेंगोडा येथे शेगाव निवासी संत गजानन महाराज प्रगट दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:42 AM2018-02-09T00:42:35+5:302018-02-09T00:43:10+5:30
लोहोणेर : संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात महिला भजनी मंडळाच्या वतीने सवाद्य भजन व भावगीत कार्यक्रम उत्साहात झाला.
लोहोणेर : शेगाव निवासी संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील महिला भजनी मंडळाच्या वतीने सवाद्य भजन व भावगीत कार्यक्रम उत्साहात झाला. नाशिक (गंगापूर रोड) येथील शरण्या महिला भजनी मंडळ, नवदुर्गा महिला भजनी मंडळ, अॅक्टिव्ह महिला भजनी मंडळ, गजानन महाराज महिला भजनी मंडळ (थत्तेनगर), शारदा महिला भजनी मंडळ (त्र्यंबकेश्वर) या मंडळांच्या भगिनींनी आपल्या सुमधुर आवाजात हार्मोनियम व तबल्याच्या साथीने सुश्राव्य भावमधुर भक्तिगीते सादर केली. या संगीतमय भजन कार्यक्रमास सुरेखा जोशी यांनी हार्मोनियमवर, तर सदाशिव केळकर यांनी तबल्याची सुरेख साथ दिली. याप्रसंगी प्रसिद्ध गायिका श्रद्धा पाठक-जोशी यांनी आपल्या सुमधुर आवाजात काही लोकप्रिय भावगीते सादर केली. लतिका कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तर हेमंत (बंडू) जोशी यांच्या वतीने महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी वणी येथील प्रसिद्ध व्यापारी विजय बोरा यांच्यासह सिद्धिविनायक मंडळाचे ट्रस्टी मंडळ, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.