संत निवृत्तीनाथ मंदिराचा प्रसाद योजनेत समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 11:16 PM2021-10-27T23:16:06+5:302021-10-27T23:17:24+5:30
केंद्र सरकारने तीर्थस्थळांमध्ये पर्यटनवाढीसाठी भारतातील आठ स्थळे प्रसाद योजनेत समाविष्ट केली असून त्यात महाराष्ट्रातील एकमेव श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचा समावेश आहे. या योजनेत आता त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराचाही समावेश करण्यास केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
त्र्यंबकेश्वर : केंद्र सरकारने तीर्थस्थळांमध्ये पर्यटनवाढीसाठी भारतातील आठ स्थळे प्रसाद योजनेत समाविष्ट केली असून त्यात महाराष्ट्रातील एकमेव श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचा समावेश आहे. या योजनेत आता त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराचाही समावेश करण्यास केंद्र सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराला अनन्य साधारण महत्त्व आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून भाविक व वारकरी मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. संत निवृत्तीनाथांची समाधी म्हणजे भाविक वारकऱ्यांचे एक ऊर्जास्थान आहे. या स्थळाचा पूर्ण विकास होण्यासाठी मंदिराचा प्रसाद योजनेत समावेश करावा, अशी मागणी गोडसे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयातील अवर सचिव शाम वर्मा यांच्याकडे आठवडाभरापूर्वी केली होती. या मागणीची दखल घेत संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचा प्रसाद योजनेत समावेश करण्याच्या प्रस्तावाला केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. डाॅ. रामकृष्ण महाराज लहवितकर, मोहन जाधव, सागर शिंदे, सुदाम घाडगे, त्र्यंबकराव गायकवाड, नीलेश गाढवे, वैभव गाढवे, तुपे महाराज, वाघचौरे महाराज, शिवा आडके, तुकाराम शिंदे, सूरज शिंदे आदींनी भजनाचा गजर करत निवृत्तीनाथ मंदिराचा प्रसाद योजनेत समावेश करण्याचे साकडे वर्मा यांना घातले होते. गोडसे यांच्या मागणीची दखल घेऊन दिल्लीतील मंत्रालयाच्या पर्यटन विभागात विशेष बैठक घेण्यात आली. केंद्रीय पर्यटन विभागाचे सचिव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मंदिराचे धार्मिक महत्त्व आदी मुद्द्यांवर यावेळी विशेष चर्चा झाली. वारकरी सांप्रदायात मंदिराचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन मंदिर आणि मंदिर परिसराचा विकास होणे गरजेचे असल्याच्या भूमिकेतून बैठकीत संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराचा प्रसाद योजनेत समावेशाच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आली.