दहा व्यक्ती, पाच संस्थांना मिळणार संत रविदास पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:09 AM2018-09-25T00:09:23+5:302018-09-25T00:10:32+5:30
नाशिक : यापूर्वी एक व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जाणार संत रविदास पुरस्कार सध्या पाच व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (दि. २४) केली. शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला संत रविदास यांच्या जीवनचरित्रावर आधारित धड्याचाही पुन्हा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार असून, प्रत्येक विभागात संत रविदास भवनाच्या कामाला या वर्षीच सुरुवात होणार असल्याचे बडोले यांनी सांगितले. राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे संस्थेच्या वर्धापन दिनासोबतच माजी मंत्री बबन घोलप यांच्या कला व राजकीय क्षेत्रातील कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून ‘त्रिवेणी संगम’ सोहळ्याच्या माध्यमातून सोमवारी बबन घोलप यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सूर्याचार्य कृष्णदेवनंदगिरी महाराज, आमदार भाऊसाहेब कांबळे, रामचंद्र अवसारे, सीमा हिरे, योगेश घोलप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर आदी उपस्थित होते. राजकुमार बडोले म्हणाले, सरकार वंचितांच्या पाठीशी आहे. दरम्यान, सत्काराला उत्तर देताना बबन घोलप यांनी अन्य महामंडळांच्या तुलनेत रविदास महामंडळावर अन्याय होत असल्याचे सांगत इतर महामंडळांप्रमाणेच रविदास महामंडळाच्या लाभांर्थ्यांनाही सोयीसुविधा व योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी केली, तर आमदार योगेश घालप यांना बबन घोलप यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी बोलताना भावना अनावर झाल्याचे दिसून आले. प्रास्ताविक दत्तात्रय गोतीसे यांनी केले. सूत्रसंचालन शंताराम कारंडे यांनी केले.
चर्मकार आयोगासाठी पाठपुरावा
राज्यात चर्मकार आयोग स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. आयोगाला राज्याची मंजुरी मिळाली असून, केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर लवकरच केंद्र व राज्य चर्मकार आयोग स्थापन करण्याचे आश्वासन राजकुमार बडोले यांनी दिले. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र व राज्यात बाबू जगजीवन राम यांच्या नावाने हा आयोग स्थापन करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून करण्यात येत आहे.