शहरात दिवसभर संततधार
By admin | Published: September 20, 2015 11:41 PM2015-09-20T23:41:50+5:302015-09-20T23:43:51+5:30
नाशिककरांत समाधान : सुटी असूनही दिवस काढला घरातच
नाशिक : शहरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यातही दमदार पावसाने हजेरी लावली असून, रविवारी सकाळपर्यंत एकूण १६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठा दिलासा लाभला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने ओढ दिल्याने काळजीची स्थिती निर्माण झाली होती. नाशिक शहरामध्येही पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र शुक्रवारी (दि.१८) कुंभमेळ्याच्या तिसऱ्या पर्वणीच्या पहाटे तीन वाजेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सलग अठरा तास पाऊस सुरू होता.
शनिवारीही अधून-मधून पावसाच्या सरी कोसळतच होत्या. रविवारी तर सकाळपासूनच संततधार सुरू झाली. त्यामुळे रस्त्यावर तुरळक वर्दळ होती. सुटी असूनही नागरिक घराबाहेर न पडल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. शहराच्या काही भागांत विजेचा लपंडावही सुरू होता.
दरम्यान, रविवारी जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झालेली पावसाची मिलिमीटरमध्ये नोंद अशी : नाशिक (६.३), इगतपुरी (२६), दिंडोरी (२), पेठ (२६.३), त्र्यंबकेश्वर (७), चांदवड (१), कळवण (२.२), सुरगाणा (९५.२), देवळा (०.६). (प्रतिनिधी)