पेठ तालुक्यात संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:03 PM2019-07-01T13:03:20+5:302019-07-01T13:04:32+5:30
पेठ -गत दोन दिवसापासून पेठ तालुक्यात पावसाने संततधार धरली असून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. शनिवार पासून तालुक्यात ...
पेठ -गत दोन दिवसापासून पेठ तालुक्यात पावसाने संततधार धरली असून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे.
शनिवार पासून तालुक्यात खºया अर्थाने पावसाने हजेरी लावली आहे. जवळपास ४८ तासापासून कोसळणाºया पावसाने नद्या नाल्यांना पुर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक मुख्य व उपरस्त्यावरून पुराचे पाणी गेल्याने संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांनी पेरून ठेवलेल्या भात व नागलीच्या रोपांना यामुळे जीवदान मिळाले असून खाचरात बर्यापैकी पाणी साचल्याने शेतकरी मशागतीला लागला आहे. पावसामुळे नेहमीप्रमाणे विजेचा लंपडाव खेडोपाडी पहावयास मिळत असून अनेक घरांनाही गळती लागली आहे. त्यामुळे घरे शाकारणीची लगबग दिसून येत आहे. पाहिल्याच पावसात नाशिक- पेठ राष्ट्रीय महामार्गासह वाडी वस्तीवरील रस्त्यांची वाट लागली आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निकाली निघाला आहे.
----------------------------
संगमेश्वर फरशीवर अडकली वाहने
सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पेठ -जोगामोडी रस्त्यावरील संगमेश्वर मंदिरानजीकच्या फरशीवरून मोठया प्रमाणावर पाणी आल्याने जवळपास तासभर दोन्ही बाजूला वाहने व प्रवासी अडकून पडले होते तर काहींनी जीव मुठीत धरून वाहत्या पाण्यातून कसाबसा मार्ग काढत दुसरे टोक गाठले. शाळेची वेळ असल्याने जोगमोडी परिसरातून येणारे शेकडो विद्यार्थी अडकून पडल्याने शाळेला उशीर झाला. दुचाकी वाहनासह बस, जीप, टेम्पो यांना तासभर प्रतिक्षा करावी लागली.