सोळा वर्षांपासून विकसीत झालेली ‘देवराई’ ठरणार मनपासाठी ‘मॉडेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 04:29 PM2019-01-15T16:29:42+5:302019-01-15T16:38:14+5:30
शहरातील ओसाड भुखंडांवर देवराई विकसीत करण्याची घोषणा नुकतीच काही दिवसांपुर्वी नाशिककरांच्या कानी पडली. या उपक्रमासाठी उपनगरमध्ये विकसीत करण्यात आलेली छोटेखानी देवराई नक्कीच मॉडेल ठरेल.
नाशिक : काशिद, गुलमोहर, पेल्ट्राफोरम, रेन-ट्री यांसारख्या पाश्चात्य वृक्षप्रजातीच्या प्रेमात पडलेल्या नाशिककरांना भारतीय प्रजातीच्या दुर्मीळ अशा पर्यावरणपुरक झाडांची ओळख व महत्त्व लक्षात यावे, या उद्देशाने आपलं पर्यावरण संंस्थेच्या वतीने सोळा वर्षांपुर्वी सिमेंटच्या जंगलात ‘देवराई’ फुलविण्यास सुरूवात करण्यात आली. संस्थेला चांगले यश आले असून महापालिकेच्या भुखंडाला हिरवाईचे कोंदण तर लाभलेच मात्र १४५ भारतीय प्रजातीची वृक्षराजी बहरल्याने जैवविविधतेचे नैसर्गिकरित्या संवर्धन होत आहे. नेमके याच धर्तीवर महापालिकेच्या उद्यान विभागाला तब्बल सोळा वर्षानंतर उपरती झाली आणि शहरातील ओसाड भुखंडांवर देवराई विकसीत करण्याची घोषणा नुकतीच काही दिवसांपुर्वी नाशिककरांच्या कानी पडली. या उपक्रमासाठी उपनगरमध्ये विकसीत करण्यात आलेली छोटेखानी देवराई नक्कीच मॉडेल ठरेल.
नाशिक महापालिकेच्या उद्यानविभागाकडून शहरातील मोकळ्या भुखंडांवर वनीकरण करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे परिसरात वृक्षराजी वाढविणारे अभिनेता सयाजी शिंदे यांना या उपक्रमासाठी निमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच आपलं पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांचा वृक्ष लागवड व संवर्धनाबाबतचा प्रत्यक्ष कार्यानुभव बघता त्यांचेदेखील मार्गदर्शन उद्यान विभागाकडून घेतले जात आहे. वृक्ष प्रजातीची निवड, जागेची उपलब्धता, पाणी व संरक्षण अन् संवर्धनाची जबाबदारी आदिंबाबत चर्चा गायकवाड यांच्यासोबत वेळोवेळी बैठका घेऊन उद्यान निरिक्षक शिवाजी आमले करीत आहेत. गट वनीकरण (ब्लॉक ट्री प्लॅन्टेशन) महापालिका शहातील मोकळ्या व सुरक्षित असलेल्या चेनलिंक फेन्सिंग केलेल्या भुखंडांवर स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने करणार आहेत.
उपनगर परिसरातील फुलसुंदर इस्टेटमध्ये अशाचप्रकारे सोळा वर्षांपुर्वी आपलं पर्यावरण संस्थेने गट वनीकरणाचे महत्त्व जाणले आणि महापालिकेच्या भुखंडावर हिरवाई फुलविली. राज्यभरातील विविध शहरे पालथे घालून रोपवाटिकांची भटकंती तसेच जंगलांमधील बी-बियाणे गोळा करुन विविध प्रजातीची रोपे मिळवून त्याची लागवड या ठिकाणी स्व-खर्चाने केली. केवळ लागवड करुन प्रश्न सुटत नसतो तर लागवड झाल्यानंतर खरे आव्हान सुरू होते, याची जाणीव ठेवत लावलेली रोपे वृक्षांमध्ये कसे रुपांतरीत होतील या दृष्टीने सातत्याने संवर्धनावर लक्ष ठेवत परिश्रम घेतले. सध्या या भुखंडावर छोटेखानी देवराई बहरलेली नजरेस पडते. आजुबाजूला उभ्या राहिल्या सिमेंट-कॉँक्रीटच्या जंगलात हे लहानसे राखलेले व विकसीत केलेले वन पर्यावरणाचा समतोल तर राखत एका ‘बुस्टर’प्रमाणे भूमिका बजावत आहेत. या देवराईला ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देत कौतूक केले आहे.
या प्रजातींची लागवड
तीवस, आसाना, मोहंदळ, अजान, भोकर, करंज, कोशींब, वरस, बिब्बा, शिवण, बिजा, हळदू, दक्षिण मोह, टेटू, हळदू, हुंब, चारोळी, भोरसाल, कळम, रोहन, पळस, सोनसावर अशा प्रजाती येथे बहरलेल्या दिसतात. यामुळे विविध पक्ष्यांसह फुलपाखरे, मधमाशांना नैसर्गिक अधिवास प्राप्त होऊन भूक भागविण्यासाठी खाद्यही उपलब्ध झाले आहे.