‘सेतू’ला विद्यार्थ्यांचा वेढा
By admin | Published: June 23, 2017 12:05 AM2017-06-23T00:05:42+5:302017-06-23T00:11:46+5:30
नाशिक : कागदपत्रे सादर करूनही दाखले मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या विद्यार्थी, पालकांचा धीर सुटत चालला असून, सेतू केंद्राबाहेरचा विळखा घट्ट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महिन्यापूर्वी सर्व कागदपत्रे सादर करूनही दाखले मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या विद्यार्थी, पालकांचा धीर सुटत चालला असून, दिवसेंदिवस सेतू केंद्राबाहेरचा विळखा घट्ट होत आहे. ठराविक दिवसांच्या मुदतीतच शाळा, महाविद्यालयीन प्रवेशाचे अर्ज कागदपत्रांसह दाखल करण्याचे बंधनकारक असल्यामुळे त्याचा फायदा मध्यस्थ व दलालांनी उठविण्यास सुरुवात केल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत प्रशाासनाने सेतू केंद्र चालकाला दंडाची नोटीस बजावली आहे.
शैक्षणिक कारणासाठी जात, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व, उत्पन्न, नॉन क्रिमीलेअर या शासकीय दाखल्यांची गरज असून, त्यासाठी सेतू वा महा ई सेवा केंद्रात अर्ज करून त्याआधारे देण्याची सोय शासनाने केली आहे. अर्जदाराने अर्ज दाखल केल्यानंतर सात दिवसांत दाखला दिला जावा, असे शासनाचे आदेश असले तरी, प्रत्यक्षात महिना उलटून गेल्यावरही शेकडो नागरिकांना दाखले मिळत नसल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे. महा ई सेवा केंद्रचालकांकडून दाखले सेतू केंद्राकडे पाठविले जातात व तेथून ते स्वाक्षरीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे दिले जातात. ही सारी प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने होत असली तरी, अनेक नागरिकांनी महा ई सेवा केंद्रात दाखल्यासाठी अर्ज करूनही ते सेतूत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत तर दाखले परिपूर्ण करून प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे पाठवूनही त्यांच्याकडून स्वाक्षरी होऊन येत नसल्याचे सेतू केंद्रचालकांचे म्हणणे आहे. अशातच गेल्या महिन्यापासून ‘महाआॅनलाइन’ या शासनाच्या सॉफ्टवेअर तसेच सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे ही सारी प्रक्रियाच संथगतीने पुढे सरकू लागली आहे. त्याचा परिणाम विद्यार्थी, पालकांवर होत असून, मुदतीत दाखले मिळत नसल्यामुळे त्यांची होणारी तगमग दलाल, मध्यस्थांच्या पथ्थ्यावर पडली आहे. त्यातूनच पैसे घेऊन दाखले दिले जात असल्याच्या त्याचबरोबर शासकीय शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतल्याच्या तक्रारी असून, वशिलेबाजीचे आरोपही होऊ लागले आहेत.
सेतू केंद्रचालकांबाबत होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने केंद्रचालकाला ५० हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर तांत्रिक दोष दूर करण्यासाठी महाआॅनलाइनचे राज्य समन्वयक सुर्वे यांनाही पाचारण करून त्यांच्या कानी सदरची बाब घालण्यात आली आहे. दहावी व बारावीनंतर पुढच्या शैक्षणिक प्रवेशासाठी ठराविक दिवसांची मुदत असून, मुदतीत दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.