सप्तशृंगगड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार? बी. राधाकृष्णन : स्वच्छतेबाबत देवी संस्थानसह ग्रामपंचायतीला विचारला प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:21 AM2018-01-01T00:21:09+5:302018-01-01T00:22:11+5:30
सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील प्लॅस्टिक पिशव्या व स्वच्छतेबाबत जिल्हा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून गड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार, असा प्रश्न जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी विचारला आहे.
सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील प्लॅस्टिक पिशव्या व स्वच्छतेबाबत जिल्हा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून गड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार, असा प्रश्न जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी विचारला आहे. ग्रामपंचायत व देवी संस्थानने जिल्हा अधिकारी यांना दोन महिन्यात श्रीक्षेत्र सप्तशृंगगड हा प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते पण याबाबत काही कारवाई न केल्याने नाराजी व्यक्त केली. सप्तशृंगगडावर आज जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व नाशिक येथील वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक पी. रामाराव यांच्या हस्ते सप्तशृंगगडावरील वनविभागाच्या विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांना सर्वत्र प्लॅस्टिकचा कचरा आढळून आला.
ग्रामपंचायत सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य गिरीश गवळी, राजेश गवळी, तहसीलदार कैलास चावडे, सहायक जिल्हा अधिकारी अमन मित्तल, उपवन संरक्षक नाशिक रामानुजम, सहायक वनसंरक्षक गायकवाड, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता केदारे यांच्या हस्ते वनविश्रामगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहायक वनरक्षक गायकवाड, वनक्षेत्रपाल शेख, वनपाल योगीराज निकम, सप्तशृंगगड वनपाल पी.के. देवरे उपस्थित होते. तसेच फनिक्युलर रोप वे ट्रॉलीला भेट देऊन कामांची पाहणी करण्यात आली व काही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे सांगितले व लवकरात लवकर भाविकांसाठी प्रकल्प चालू करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा, रोव वे डायरेक्टर शिव शंकर लातुरे, संपर्कप्रमुख सोमनाथ लातुरे, मॅनेजिंग डायरेक्टर राजू गुरुबक्षानी, रोप वे सुपरवायझर सोपान कोडमंगले आदी उपस्थित होते.
कानउघडणी
सप्तशृंगगड हे तीर्थक्षेत्र असल्याने हे क्षेत्र प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते, पण याकडे ग्रामपंचायत व देवी संस्थान गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. यामुळे जिल्हाधिकारी यांनी देवी संस्थानचे व्यवस्थापक व सप्तशृंगगड ग्रामपंचायत सदस्य व संरपच यांची चांगलीच कानउघडणी करीत धारेवर धरले. प्लॅस्टिकमुक्तीचे फलक ठिकठिकाणी लावण्यात यावे जेणेकरून भाविकांना माहिती होईल, असे आदेश देवी संस्थान व ग्रामपंचायतीला देण्यात आले. स्वच्छता व प्लॅस्टिकमुक्तीबाबत दिरंगाई केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.