नाशिकमधील सप्तश्रृंगगडावर देवीच्या चैत्रोत्सवास दिमाखदार प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 12:02 PM2017-09-21T12:02:21+5:302017-09-21T14:52:17+5:30

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तश्रृंग निवासिनी देवीच्या चैत्र उत्सवास दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.

Saptashrunga Nivasini Devi's Chaitra celebrated in Saptashringgarh in Nashik | नाशिकमधील सप्तश्रृंगगडावर देवीच्या चैत्रोत्सवास दिमाखदार प्रारंभ

नाशिकमधील सप्तश्रृंगगडावर देवीच्या चैत्रोत्सवास दिमाखदार प्रारंभ

Next

सप्तश्रृंगगड (नाशिक), दि. 21 - हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री. सप्तश्रृंग निवासिनी देवीच्या चैत्र उत्सवास दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. गुरुवारी पहाटेपासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा-सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत असून, यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. 

सकाळची पंचामृत महापूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. श्री. अरुण ढवळे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली या वेळी संस्थानचे अध्यक्षा तथा अति. सत्र न्यायाधीश, मा. श्रीमती.यु.एम.नंदेश्वर विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी, डॉ.  रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे उपस्थित होते. 

सकाळी ९.०० वा. नवचंडी व होमहवन पूजन होऊन दुपारी ३.०० वाजता संस्थांनच्या कार्यालयात आई साहेबांच्या पादुकांची पूजा करून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यात संस्थान कार्यालयापासून मिरवणूक काढून शिवालय तीर्थावर जल पूजन करून पहिली पायरी येथे पालखीची विधिवत आरती करण्यात आली. 

या वेळेस मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांपैकी ८ ते १० हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा उत्सवादरम्यान दोन वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा देण्यात येणार असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. न्यासाच्या परिसरात ३ ठिकाणी भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय व चुकाचूक होवू नये, त्या दृष्टीने उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून एकूण ६५ सीसीटीव्हींवर ९५ सुरक्षारक्षक व ५ बंदूकधारी सुरक्षारक्षक व महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दलाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहेत. ऐन वेळेस उद्भवणाऱ्या आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. न्यासाच्यावतीने सर्व भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था व आवश्यक ठिकाणी एकूण ११ पाणपोया व २४ तास लॉकर, चप्पल स्टँडची व्यवस्था करण्यात आलेली असून न्यासाच्या परिसरात सर्वत्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ व न्यासाचे एकूण ५ जनरेटरद्वारे अखंडित विद्युत पुरवठा ठेवण्यात येणार असून संपूर्ण गड परिसर स्वच्छतेसाठी ५० कर्मचारी नेमणूक करण्यात आलेली आहे.

 21 सप्टेंबर  ते 30 सप्टेंबर दरम्यान पूर्णतः खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भाविकांसाठी ३०० बसेस प्रवाशांना नांदुरी येथून ने - आण करणार आहेत. सप्तशृंगगडापासून एक किलो मीटर अंतरावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. या चैत्र उत्सव यात्रा यशस्वीतेसाठी न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी  भगवान नेरकर जनसंपर्क अधिकारी श्री. भिकन वाबळे आदींसह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वर्ग, तसेच प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रयत्नशील आहेत.
 
उत्सव काळात भाविकांसाठी नांदुरी व सप्तशृंगगड येथे सावलीसाठी मंडप टाकून सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संस्थान मार्फत २ टँकर व २ टँकर भाडे तत्वार लावण्यात आले असून, सप्तशृंगगडावर व परिसरात आग लागून कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये म्हणून २४ तास अग्निशमन बंबाची व्यवस्था करण्यात आली आहे .
 

Web Title: Saptashrunga Nivasini Devi's Chaitra celebrated in Saptashringgarh in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.