सप्तश्रृंगी सह. सुतगिरणी संस्थेची नोंदणी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 06:46 PM2019-03-05T18:46:41+5:302019-03-05T18:50:37+5:30
देवळा : सप्तश्रृंगी सहकारी सुतगिरणी मर्या. देवळा हया संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आल्यानंतर सदर सुतगिरणीच्या सभासदांना त्यांची रक्कम परत करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली असून भागधारकांना धनादेशांचे वाटप करण्यात आले.
देवळा : सप्तश्रृंगी सहकारी सुतगिरणी मर्या. देवळा हया संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आल्यानंतर सदर सुतगिरणीच्या सभासदांना त्यांची रक्कम परत करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली असून भागधारकांना धनादेशांचे वाटप करण्यात आले.
१९९७ साली नियोजित सप्तश्रृंगी सहकारी सुतगिरणी मर्या. देवळा ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. संस्थेचे सभासदत्व घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी संस्थेचे शेअर्सपोटी रक्कम जमा केली व ते संस्थेचे सभासद झाले होते. मात्र हि सुतगिरणी अस्तित्वात आली नाही. कालांतराने सुतगिरणीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येवून त्यावर प्रशासक नेमण्यात आले. नंतर हि संस्था अवसायानात निघाली. देवळयाचे सहाय्यक निबंधक संजय गीते यांची अवसायक म्हणून सुतगिरणीवर नेमणुक झाली. सुतगिरणीची नोंदणी रद्द झालेली नसल्यामुळे सभासदांची शेअर्सची रक्कम अडकून पडली होती. अडकलेली हि रक्कम त्यांना परत मिळावी यासाठी सभासदांनी सातत्याने प्रयत्न केले, अखेर अवसायानात निघालेल्या या सुतगिरणीची नोंदणी रद्द करण्याचे आदेश संचालक वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन नागपूर यांनी दिल्यानंतर सभासदांची शेअर्सची रक्कम परत मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला होता.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे अध्यक्ष केदा अहेर, सहाय्यक निबंधक संजय गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत सुतगिरणीच्या भागधारकांना धनादेशांचे वाटप करण्यात आले. कौतिक हिरे, सतिश राणे, निंबाजी अहेर, जिभाऊ वाघ, रामदास कानडे आदी दहा सभासदांना धनादेश देवून शेअर्स परत करण्याचा शुभारंभ करण्यात आला.
सभासदांनी विहीत नमुन्यातील अर्जासोबत शेअर्स पावती, आधार कार्ड व रेशनकार्डची छायांकित प्रत, तसेच दोन पासपोर्ट साईज फोटो जोडावेत. सभासद मयत असल्यास न्यायालयाचा किंवा तहसिलदारांचा वारस दाखला जोडणे आवश्यक आहे. सुतगिरणीच्या सभासदांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अवसायक तथा सहाय्यक निबंधक संजय गीते यांनी केले आहे.