सप्तशृंगी देवी मंदिर ४५ दिवस बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 01:52 AM2022-07-13T01:52:10+5:302022-07-13T01:52:27+5:30
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती स्वरूप मूर्ती देखभाल कामासाठी दि. २१ जुलै ते ५ सप्टेंबर या ४५ दिवसांच्या कालावधीत सप्तशृंगी देवी मंदिर बंद राहणार आहे, अशी माहिती सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे.
नाशिक : उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती स्वरूप मूर्ती देखभाल कामासाठी दि. २१ जुलै ते ५ सप्टेंबर या ४५ दिवसांच्या कालावधीत सप्तशृंगी देवी मंदिर बंद राहणार आहे, अशी माहिती सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे. २०१२ ते १३ पासून भगवती मूर्ती संवर्धन देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरू होते. सद्य:स्थितीत अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी शासनाच्या पुरातत्त्व विभाग आयआयटी पवई मुंबई मे अजिंक्यतारा कन्सल्टन्सी नाशिक यांच्यामार्फत तज्ज्ञ मार्गदर्शन प्राप्त करून भगवती मूर्ती संवर्धन व देखभालसाठी यादृष्टीने अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने गुरुवार, दि. २१ पासून पुढील ४५ दिवस सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांसह सर्वांना प्रत्यक्ष दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र, विश्वस्त संस्थेच्या वतीने भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्या पायरीजवळील सप्तशृंगी देवीची हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या पर्याय दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत ठेवली जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांनी दिली.