सप्तशृंगीला अभिषेक
By admin | Published: October 16, 2016 01:18 AM2016-10-16T01:18:27+5:302016-10-16T01:19:09+5:30
कोजागरी उत्सव : कावडधारक नतमस्तक
सप्तशृंगीला अभिषेक कोजागरी उत्सव : कावडधारक नतमस्तकवणी : कोजागरी पौर्णिमेला सुमारे ७० हजार कावडधारक सप्तशृंगी चरणी नतमस्तक झाले. पदयात्रा करत आणलेल्या तीर्थाने सप्तशृंगीला अभिषेक करून पुढल्या वर्षी येण्याचे अभिवचन देत भावपूर्ण अंतकरणाने निरोप घेतला.
अर्धेपीठ गणल्या जाणाऱ्या सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेला आज सकाळपासून कावडधारकांची मंदियाळी सुरू होती. महाराष्ट्रातील नंदुरबार, शहादा तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात राज्यातील कावडधारकांचा यात सहभाग होता. आज दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी कोजागरी पौर्णिमेस प्रारंभ झाल्यानंतर दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी कावडधारकांनी आलेले तीर्थ घेण्यास सुरुवात करण्यात आली. गडावर ४०० लिटर क्षमतेच्या २० स्टीलच्या पंचपात्र्यांमध्ये हे तीर्थ गोळा करण्यात आले. सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी तीर्थांच्या अभिषेकास प्रारंभ करण्यात आला. रात्री ११ वाजेपर्यंत हा विधी सुरू होता. तद्नंतर भगवतीचा सुवर्ण अलंकाराने साजशृंगार करून सजावट व सुशोभीकरण करण्यात आले.
यानंतर न्यासाचे विश्वस्त नाना सूर्यवंशी यांच्या हस्ते सपत्नीक देवीची विशेष महापूजा व आरती करण्यात आली. भाविक व कावडधारकांना मोफत महाप्रसाद, पिण्याचे पाणी, आरोग्यसुविधा पोलीस बंदोबस्त, आपत्कालीन परिस्थिती नियंत्रण करण्याची प्रशासकीय यंत्रणा या सर्व बाबींची पूर्तता अग्रक्रमाने करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांनी दिली. कोजागरी पौर्णिमेला सप्तशृंगीला अभिषेक घालण्याची कावडधारकांची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. गुजरातमधूनही कावडधारक गडावर दाखल झाले. (वार्ताहर)