महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सापुतारा सहलीचे
By admin | Published: October 11, 2014 12:15 AM2014-10-11T00:15:53+5:302014-10-11T00:17:50+5:30
महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सापुतारा सहलीचे
मालेगाव : येथील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मतदारांनी मतदान करावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सहली आयोजित केल्या जात आहेत. यात एका उमेदवाराने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकदिवसीय सापुतारा सहलीचे आयोजन केले असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराचे तीन दिवस शिल्लक राहिलेले असून, येथील दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी मतदारांना मतांसाठी वेगवेगळी प्रलोभने दाखविण्यास सुरुवात केली आहे. यात पैशांसह विविध वस्तूंचे, खेळाचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवाटप, जेवणावळ किंवा हॉटेल दर्शन आदि प्रकारांचा समावेश आहे. दोन्ही मतदारसंघात पैशांचा पाऊस पडत असून, अनेक भेटवस्तू पदरात घातल्या जात आहेत.मालेगाव मध्य मतदारासंघात आचारसंहितेच्या नावाने ठणठण असल्याचे येथील शिवाजी पुतळा भागात लावलेला पक्षीय ध्वज, आझादनगर भागात पैसे वाटताना पकडण्यात आलेले तिघे, रात्रीचा सुरू असलेला प्रचार या घटनांवरून उघडकीस आले आहे. या सर्वांवर कडी करत एका उमेदवाराने मते मिळविण्यासाठी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून, महिलांना एकदिवसीय सापुतारा दर्शन घडविले जात असल्याची चर्चा आहे. नवरात्र व बकरी ईदच्या समाप्तीचा योग साधत या उमेदवारांची वाहने रोज वेगवेगळ्या चौकात उभी राहतात. परिसरातील उमेदवारांचे नेते किंवा कार्यकर्ते घरोघरी जाऊन महिलांना सहलीसाठी तयार करून पाठवित आहेत. या सहलीत महिलांच्या खाण्यापिण्यासह परिसरातील प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडविले जात आहे. या सहलीदरम्यान महिलांना उमेदवारांची महती सांगण्यात येऊन मतदान करण्याचे आश्वासन घेत असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)