सरदवाडी रस्ता बनला धोकादायक
By admin | Published: February 9, 2016 11:01 PM2016-02-09T23:01:36+5:302016-02-09T23:02:25+5:30
गतिरोधकाची मागणी : भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे पादचारी, विद्यार्थी धास्तावले
सिन्नर : येथील सिन्नर-सरदवाडी रस्त्यावर वाहने भरधाव जात असल्याने पादचारी व विद्यार्थी धास्तावले आहेत. या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी नगरसेवक बापू गोजरे यांच्यासह नवजीवन डे स्कूल, कीडझ् अकॅडमी, इरा इंटरनॅशनल स्कूल, सरदवाडी प्राथमिक विद्यामंदिर व शारदा महाविद्यालयाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक उपविभागीय अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आडवा फाट्यापासून दोन किलोमीटरपर्यंतच्या सरदवाडी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचे अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. सरदवाडी रस्त्यावरील मधुर मिठास, वाजे लॉन्स, कर्पे सुपर मार्केट व अजिंक्यतारा हॉटेलजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याठिकाणी गतिरोधक बसविण्याबाबत सिन्नर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावही मंजूर करण्यात आला आहे.
सरदवाडी रस्त्यालगत शिवाजीनगर, कमलनगर, सरस्वतीनगर, संजीवनीनगर, महालक्ष्मीनगर, वृंदावननगर, झापवाडी, मॉडर्न कॉलनी, शांतीनगर, विनर संकुल, देशमुखनगर, साईबाबानगर, महादेव कॉलनी, ढोकेनगर आदिंसह अनेक उपनगरे आहेत. डांबरीकरणामुळे वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या जीवितास धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सरदवाडी
रस्त्यावर चार ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात
आली आहे. याबाबत उपविभागीय अभियंता अशोक पाटील यांना नगरसेवक गोजरे यांनी निवेदन दिले आहे. (वार्ताहर)