सराफ बाजार ३१ मार्चपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:23 PM2020-03-24T23:23:26+5:302020-03-25T00:16:09+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक सराफ संघटनेने शुक्रवार (दि.२०) पासून सलग तीन दिवस शहर, उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु, या काळात पोलीस प्रशासनाने सराफ बाजारातील गस्त वाढवून व्यावसायिकांच्या सराफी पेढ्यांना सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक सराफ संघटनेने शुक्रवार (दि.२०) पासून सलग तीन दिवस शहर, उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवल्यानंतर आता सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ मार्चपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु, या काळात पोलीस प्रशासनाने सराफ बाजारातील गस्त वाढवून व्यावसायिकांच्या सराफी पेढ्यांना सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणावर यावर्षी कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक नागरिक सोने खरेदीला प्राधान्य देतात, तर अनेकजण चांदीची गुढी, तसेच पूजेचे ताट-वाटी असे साहित्य खरेदी करतात. परंतु, यावर्र्षी पाडव्याच्या पाच दिवसांपूर्वीपासूनच सराफांची सर्व दुकाने बंद असल्याने सराफ बाजारात शुकशुकाट दिसून येत असून, चार दिवसांत सराफ बाजारात जवळपास दोनशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. परंतु, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नाशिक, सिडको, पंचवटी सराफ संघटनांचे १ हजार ४८० सभासद या निर्णयात सहभागी होणार आहेत. सराफ बाजारात सराफी व्यावसायिक अ वर्गात येतात, तर कारागीर, जंगम हे घटक ब वर्गात येतात. शहरात एकूण पाच हजार कारागीर असून, यात सुमारे दोन हजार पश्चिम बंगालच्या कारागिरांचा समावेश आहे. या सर्व कारागिरांना बंदच्या काळात हजार रुपयांपर्यंतचा किराणा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सराफ व्यावसायिकांनी घेतला आहे.
प्रशासनाच्या सूचनेमुळे २० व २१ तारखेला शहर व परिसरातील सर्व सराफी पेढ्यांनी व्यवहार बंद ठेवल्यानंतर रविवारी जनता कर्फ्यूचेही कडेकोट पालन केले. यापुढील सूचना मिळेपर्यंत व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सराफी पेढ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने शहरात गस्ती वाढविण्याची गरज आहे. सराफ बाजारात कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे. परंतु, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नाशिक, सिडको, पंचवटी सराफ संघटनांच्या हजारो सभासदांनी या निर्णयात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
- चेतन राजापूरकर, नाशिक सराफ संघटना