दोघा सोनसाखळी चोरांसह सराफ पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 01:26 AM2021-11-22T01:26:55+5:302021-11-22T01:28:02+5:30
मागील आठवड्यात कदम मळ्यात घडलेल्या सोनसाखळी गुन्ह्याचा तपास करत गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात यश मिळवले आहे. दोघा सोनसाखळी चोरांसह त्यांच्याकडून चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून शहरात त्यांनी यापूर्वी केलेले सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
नाशिक : मागील आठवड्यात कदम मळ्यात घडलेल्या सोनसाखळी गुन्ह्याचा तपास करत गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्यांचा माग काढण्यात यश मिळवले आहे. दोघा सोनसाखळी चोरांसह त्यांच्याकडून चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून शहरात त्यांनी यापूर्वी केलेले सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
अट्टल सोनसाखळी चोरांची जोडी गजाआड केल्यानंतरसुद्धा शहरात अधुनमधून वेगवेगळ्या भागात सोनसाखळी चोरीच्या घटना सुरुच आहेत. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अशाच एका गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी संशयित सईद आसमोहमद सैय्यद उर्फ छोट्या (२९, रा. पखाल रोड, द्वारका) व आफताब नजीर शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची कसून चौकशी केली असता, चोरी केलेले दागिने घेणाऱ्या सराफाची माहिती समोर आली. पोलिसांनी संशयित विशाल दुसाने या सराफ व्यावसायिकासह दलाल अजय सिंगलाही ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार रवींद्र बागुल यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पथकाने पंचवटीतील गणेशवाडीमध्ये सापळा रचला. चोरट्यांनी चौकशीमध्ये कदम मळ्यात चेनस्नॅचिंग केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
--इन्फो--
दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत
चोरट्यांच्या जोडीकडून पोलिसांनी १७ ग्रॅम वजनाचे रुपये ७३ हजारांचे चोरी केलेले मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली ८० हजार रुपयांची दुचाकी असा दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोघांनी आतापर्यंत मुंबईनाका, गंगापूर व उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत महिलांची सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याचे समोर आले आहे.
--इन्फो--
दागिन्यांची विक्री करणारा मित्रही गोत्यात
दोघांनी महिलांचे दागिने हिसकावल्यानंतर त्यांचा मित्र संशयित अजय सिंह हा त्या दागिन्यांची विक्री सराफ व्यावसायिक संशयित विशाल दुसाने याला करत होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेत चौकशी केली. गुन्हे शाखेकडून पुढील तपासाकरिता या चौघांना उपनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.