सरस्वती नदीपात्रात वीर पाडव्याचा पदन्यास रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 06:00 PM2019-03-20T18:00:24+5:302019-03-20T18:01:25+5:30
सिन्नर : येथील भैरवनाथ मंदिरासमोर नगरपरिषदेने सरस्वती नदीपात्रात मोकळे मैदान केल्याने वीरांच्या पदन्यासाला जागा मिळाली आहे. मंदिरासभोवतलच्या परिसरात जागा न राहिल्याने वीर पाडवा साजरा करण्यासाठी अडथळे निर्माण झाले होते. वीरांच्या पारंपरिक पदन्यासाला जागेचा अडसर निर्माण झाला होता.
नगरपरिषदेने कोरडे पडलेल्या सरस्वतीनदीच्या पात्रात त्यासाठी जागा तयार करण्याची संकल्पना नगरपालिकेने यावर्षी अमलात आणली आहे. मंगळवारपासूनच नदीपात्रात सपाटीकरण व सुविधा निर्माण करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले. रात्रंदिवस हे काम करुन गुरु वारी दुपार पर्यंत हे मैदान वीर पाडवा साजरा करण्यासाठी सज्ज होणार आहे.सुमारे ३५ वर्षांपूर्वी वीर पाडव्याला वीरांचा पदन्यास नदीपात्रातील हिरवळीवर होत असे. तो पाहण्यासाठी सिन्नरकरांची मोठी गर्दी होत होती. मात्र नदीपात्राभोवती व्यापारी संकुलांची उभारणी व आजूबाजुलाही बाजार व दुकाने उभी राहिल्याने जागा उरली नाही. त्यामुळे वीरांचा पदन्यास अडथळ्यांनी संकुचित झाला होता. मात्र यावेळी नगरपरिषदेने त्यासाठी कोरड्या नदीपात्रात पूर्वी सारखी जागा उपलब्ध करुन देण्याचे काम हाती घेतले. पात्रात उतरण्यासाठी भैरवनाथ मंदिरा समोरील पादचारी पुलाशेजारच्या पायऱ्यांचा वापर करता येणार असून खासदार पुलाच्या बाजुने खाली उतरण्यासाठी रस्ताही करण्यात आला आहे. वीर पाडवा साजरा करण्यासाठी वीर मंडळांनी तसेच तो पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी नदीपात्राचा वापर करावा असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.