सारी, फ्लूचा आठ हजार नागरिकांना विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:25+5:302021-05-29T04:12:25+5:30
कोरोनाप्रमाणेच हवेच्या संसर्गातून झपाट्याने पसरणाऱ्या सारी व फ्लू या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच असली तरी, त्यातल्या त्यात सारीच्या रुग्णांना ...
कोरोनाप्रमाणेच हवेच्या संसर्गातून झपाट्याने पसरणाऱ्या सारी व फ्लू या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच असली तरी, त्यातल्या त्यात सारीच्या रुग्णांना तीव्र श्वसनाचा गंभीर आजाराचा धोका अधिक आहे, तर फ्लू हा बदलत्या हवामानानुसार दरवर्षी सार्वत्रिक होणारा आजार असल्याचे मानले जात असले तरी, फ्लूमुळेदेखील येणारी शारीरिक कमजोरी सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात अधिक धोकेदायक मानली जात आहे. नाशिक जिल्ह्यात अलीकडेच आरोग्य विभागाने कोरोना वगळता अन्य अजारांनी पीडित असलेल्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात आली. त्यात आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने त्यांची तपासणी केली असता, यातील सुमारे साडेसहाशे रुग्ण सारी या श्वसनाच्या गंभीर आजाराचे असल्याचे समोर आले आहे. सारी आजाराची लक्षणे कोरोनासारखीच असून, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी व श्वास घेण्यास त्रास होण्यासारखी लक्षणे आहेत. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास न्यूमोनिया होण्याचा त्याचबरोबर शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावून धोकेदायक होण्याची शक्यता असते. त्यामानाने फ्लूचा फारसा धोका नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असले तरी, वेळीच त्यावर उपाय होणेही तितकेच गरजेचे असल्याचा सल्ला दिला जात आहे. जिल्ह्यात आठ हजारांहून अधिक रुग्णांना फ्लूचा विळखा बसला आहे. सर्दी, खोकला, ताप असे त्याचे स्वरूप असले तरी, कोरोनाप्रमाणेच संसर्गित असलेल्या या आजाराचा प्रादुर्भाव वेगाने होऊ शकतो तसेच सध्या हवेत कोरोनाचे विषाणू असल्यामुळे हा धोका न टाळता येण्यासारखा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
चौकट==
लहान, मोठ्यांमध्ये वेगळा व्हायरस
सारी वा फ्लू हे दोघेही हवेतून पसरणारे आजार असले तरी, दोघांचे विषाणू वेगवेगळे आहेत. लहान मुलांसाठी वेगळा व मोठ्या व्यक्तींसाठी वेगळे विषाणू असल्यामुळे या आजारांवर उपचारासाठीदेखील मार्गदर्शक तत्त्वे ठरवून देण्यात आली आहेत. विशेषकरून या दोन्ही आजारांमध्ये शारीरिक सक्षमता अधिक महत्त्वाची मानली जाऊन प्रतिजैविकांच्या माध्यमातून त्यावर मात करता येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.