सरकारवाडा : राजस्थानमध्ये मौजमजा करणाऱ्या सोनसाखळी चोरास ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:35 PM2019-11-18T13:35:57+5:302019-11-18T13:37:00+5:30
सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दोन महिन्यांपुर्वी प्रमोद महाजन उद्यान परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणारा संशयित सरफराज उर्फ फिरोज बेग (२९) यास अजमेरमधून अटक करण्यास सरकारवाडा पोलिसांना यश आले.
नाशिक : शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. दोन दिवसांपुर्वीच गुन्हे शाखेने दोघा सोनसाखळी चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने एका सराईत सोनसाखळी चोरट्याला थेट राजस्थानमधील अजमेर शहरात जाऊन बेड्या ठोकल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दोन महिन्यांपुर्वी प्रमोद महाजन उद्यान परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणारा संशयित सरफराज उर्फ फिरोज बेग (२९) यास अजमेरमधून अटक करण्यास सरकारवाडा पोलिसांना यश आले. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्याकडून शहरातील विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे संशयित गुन्हेगाराचा माग काढत त्याच्या परराज्यातून मुसक्या आवळल्या. तेथे सतत तीन दिवस दबा धरून बसल्यानंतर सरफराज हा पथकाच्या हाती लागला. त्यास ताब्यात घेऊन पोलिस पथक नाशिकमध्ये दाखल झाले. बेग यास रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.१९) पोलीस कोठडी सुनावली.
सोनसाखळी चोरी केल्यानंतर बेग याने नाशिकसह महाराष्टÑ सोडले होते. तो राजस्थान राज्यातील अजमेर, जयपूरसारख्या अन्य शहरात मौजमजा करत होता. याबाबतची खात्रिशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून त्यास अटक केली. काही दिवसांपुर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने अशाच पध्दतीने अक्षय उत्तम जाधव (२३,रा.चुंचाळे) यास थेट दमण केंद्रशासित प्रदेशातून अटक केली. त्यानेही सोनसाखळी चो-या केल्यानंतर दमण गाठले होते. तेथे तो मौजमस्ती करत असल्याची गुप्त बातमी पथकाला होती. त्याची कसून चौकशी केली असता पोलिसांनी त्याचा दुसरा साथीदार संशयित सुनील जयराम ताठे उर्फ घा-या (२१,रा.चुंचाळे) यालाही अटक केली आहे. या आठवडाभरात तीन सोनसाखळी चोर गजाआड करण्यास पोलिसांना यश आले आहे.