महिला बालकल्याण सभापतिपदी सरोज अहिरे
By admin | Published: May 12, 2017 11:04 PM2017-05-12T23:04:40+5:302017-05-12T23:05:06+5:30
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी भाजपाकडून सरोज अहिरे यांनी, तर उपसभापतिपदासाठी कावेरी घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी भाजपाकडून सरोज अहिरे यांनी, तर उपसभापतिपदासाठी कावेरी घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून सभापतिपदासाठी नयना गांगुर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी, समितीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने सभापतिपदी सरोज अहिरे यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच बाकी आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी सोमवारी (दि. १५) दुपारी ४ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीवर तौलनिक संख्याबळानुसार भाजपा-५, शिवसेना-३ आणि राष्ट्रवादी-१ असे पक्षीय बलाबल आहे. समितीवर भाजपाच्या कावेरी घुगे, प्रियंका घाटे, भाग्यश्री ढोमसे, सरोज अहिरे व शीतल माळोदे, शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, नयना गांगुर्डे व पूनम मोगरे आणि राष्ट्रवादीच्या समीना मेमन यांची नियुक्ती झालेली आहे. शुक्रवारी (दि. १२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार, भाजपाकडून सभापतिपदासाठी नाशिकरोड विभागातून निवडून आलेल्या सरोज अहिरे यांनी, तर उपसभापतिपदासाठी सिडको विभागातील कावेरी घुगे यांनी उमेदवारी अर्ज नगरसचिव ए. पी. वाघ यांच्याकडे सुपूर्द केले. तर शिवसेनेकडून केवळ सभापतिपदासाठी नयना गांगुर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सरोज अहिरे यांच्या अर्जावर सूचक म्हणून उद्धव निमसे, तर अनुमोदक म्हणून स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या स्वाक्षऱ्या असून, कावेरी घुगे यांच्या अर्जावर सूचक म्हणून जगदीश पाटील व अनुमोदक म्हणून सुरेश खेताडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिवसेनेच्या नयना गांगुर्डे यांना सूचक म्हणून विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते तर अनुमोदक म्हणून गटनेता विलास शिंदे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अहिरे व घुगे यांनी अर्ज दाखल केला त्याप्रसंगी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक उद्धव निमसे, जगदीश पाटील, सुरेश खेताडे आदी उपस्थित होते, तर गांगुर्डे यांनी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.
सेनेकडून औपचारिक विरोध
विभागीय आयुक्तांनी रिपाइंसोबत गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळल्याने त्याविरुद्ध शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सध्या बाब न्यायप्रविष्ट आहे. महिला व बालकल्याण समितीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असतानाही केवळ न्यायालयीन याचिकेसमोर वेगळा संदेश जाऊ नये, याची पुरेपूर काळजी शिवसेना घेत असून, त्यासाठीच औपचारिक विरोध म्हणून सभापतिपदासाठी नयना गांगुर्डे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. सेनेने उपसभापतिपदासाठी अर्ज दिलेला नाही, त्यामुळे कावेरी घुगे यांची बिनविरोध निवड झालेली आहे.