गोदावरी स्वच्छतेसाठी सरपंच झाले आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:13 AM2018-04-01T00:13:25+5:302018-04-01T00:13:25+5:30
नाशिक महानगरपालिकेतून गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी आणि नदीला विळखा घालणाऱ्या पाणवेलींमुळे नदीचे पाणी खराब होऊन मृत्युमुखी पडलेल्या हजारो मासे आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या ४२ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून पाणवेली तत्काळ काढाव्यात, नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आणि संबंधित पत्रव्यवहार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी करण्यात आला आहे.
सायखेडा : नाशिक महानगरपालिकेतून गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी आणि नदीला विळखाघालणाऱ्या पाणवेलींमुळे नदीचे पाणी खराब होऊन मृत्युमुखी पडलेल्या हजारो मासे आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या ४२ गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून पाणवेली तत्काळ काढाव्यात, नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आणि संबंधित पत्रव्यवहार जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी करण्यात आला आहे. पालकमंत्री महाजन मुंबईत असल्याने शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही; मात्र लवकरच गोदाकाठच्या सर्व गावातील सरपंच आणि पदाधिकारी यांच्या समवेत ग्रामपंचायत ठराव आणि निवेदन देण्यात येणार आहे. गोदावरीला आलेल्या पाण्यामुळे यापूर्वी सायखेडा, चांदोरी, करंजगाव आदी भागात अडकलेल्या पाणवेली वाहून गेल्या, तर पुन्हा नाशिक भागातून पाणवेली वाहत आल्या आहे. नदीपात्रात आढळणारे कोंबडा, रऊ, कटली, मरळ, शिंगी, वाडीस, तालेपा, बळू, माळी, बोदीड, गेरुंजी, सोनार, भिंगार, खडशी, नवरंग, झिंगा, वाबळी, वाम, बांगूर आदी हजारो मासे मृत झाले आहे. दूषित पाण्याने पाण्यावर हिरवाई, तसेच मृत माशांचा थर, त्यातग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने समस्यांत आणखी भर पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पाऊलेउचलावी, अशी मागणी माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी केली आहे.
पाण्याला दुर्गंधी, आरोग्याच्या तक्रारी
गोदावरी उगमस्थानापासूनच समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. त्यात नाशिक महानगरपालिका हद्दीतील, औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने, गोदाकाठ भागातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागते. ओढा येथे गोदातीरावर असलेल्या डॅमवर अनेक दिवसांपासून पाणी साचून होते, हे पाणी आवर्तन आल्याने गोदाकाठ भागात वाहून येत, या भागात पाण्याला दुर्गंधी येत आहे. तर आवर्तन सोडले जाते तेव्हा पाणी पुढे जावे, यासाठी गोदाकाठ भागातील वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने, नेहमीच पाणी असलेल्या गोदाकाठ भागातील शेतकरी, ग्रामस्थांना पाणी असूनही नाहक त्रास सहन करावा लागतो. सदर प्रश्न ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणला होता. या संदर्भात बातम्या प्रकाशित झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे.