टॅँकर सुरू होत नसल्याने सरपंचांचा राजीनामा
By admin | Published: February 1, 2016 11:34 PM2016-02-01T23:34:19+5:302016-02-01T23:38:15+5:30
निमगाव, सिन्नर : खासदार, आमदार शिवसेनेचे असूनही उपयोग नाही
सिन्नर : शिवसेनेचे सिन्नर तालुका उपप्रमुख व निमगाव-सिन्नरचे सरपंच बाळासाहेब सानप यांनी गावासाठी पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू होत नसल्याने सरपंचपदाचा राजीनामा आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे सुपूर्द केला.
राज्यात सेना-भाजपाचे सरकार आहे. नाशिकचे खासदार व सिन्नरचे आमदार शिवसेनेचे असताना तसेच सरपंचही शिवसेनेचा असूनही गावात पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू नसेल तर त्या सरपंच पदाचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित करीत सानप यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला. सरपंच पदाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याने पाण्यासाठी गावातील महिलांचे होणारे हाल आपल्याला पाहावत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निमगाव-सिन्नर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निमगावच्या वाड्यावस्त्यांवर एका टॅँकरच्या दोन फेऱ्या सुरू आहेत. गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहिरीनेही तळ गाठल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील विहिरीचे पाणी आटत आले असतानाच आपण वाढीव टॅँकरचा प्रस्ताव तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचा दावा सानप यांनी केला आहे. सार्वजनिक विहीर पूर्णपणे आटलेली असताना मागणी करूनही गावासाठी टॅँकर सुरू होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गावात चार हातपंप असून, त्यापैकी तीन बंद आहेत. त्यामुळे एका हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिलांची पहाटेपासूनच मोठी गर्दी होते. गावात तीन सार्वजनिक विहिरी असून, दलितवस्तीवरील विहिरीला केवळ दोन फूट पाणी असून, ते केवळ आठ दिवस पुरेल असे सानप यांचे म्हणणे आहे. गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना तहसीलदार ग्रामस्थांची टंचाईच्या विषयावर चेष्टा करीत असल्याचा आरोपही सानप यांनी केला आहे.
पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही टॅँकर सुरू केला जात नसल्याचे सानप यांनी म्हटले आहे. सुमारे साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत असल्याने तहसीलदारांच्या कारभाराला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी तहसीलदारांवर अंकुश ठेवावा, अशी मागणीही सानप यांनी केली आहे. (वार्ताहर)