सरपंचाचा अपात्रतेचा अर्ज फेटाळला
By admin | Published: October 20, 2016 01:07 AM2016-10-20T01:07:15+5:302016-10-20T01:30:55+5:30
सरपंचाचा अपात्रतेचा अर्ज फेटाळला
चांदवड : तालुक्यातील राहुडच्या सरपंच मंगला बाळासाहेब गांगुर्डे व सदस्य चित्रा चिंधू पवार यांनी पदाचा गैरवापर करून सरकारी जागेत अतिक्रमण केल्याची तक्रार माजी सरपंच धर्मा दत्तू सोमवंशी, दत्तू केशव पवार, विठोबा भिवा पवार, रतन रामभाऊ पारधे व संजय लक्ष्मण निकम यांनी मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या कोर्टात दाखल केली होती.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ व १६ नुसार ग्रामपंचायत विवाद अर्ज दाखल केल्याने सदर प्रकरणी सुनावणीचे काम पूर्ण होऊन अपर जिल्हाधिकारी स्वामी यांनी राहुडचे सरपंच मंगला गांगुर्डे व सदस्य चित्रा पवार यांचे पद अबाधीत ठेवून अर्जदारांचा अर्ज फेटाळून लावला. याबाबत उच्च न्यायालयाने २०१२मध्ये दिलेल्या निर्णयानुसार अतिक्रमणाचे कृत्य हे निवडणूक लढविणारा किंवा निवडून आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचे किंवा कुटुंबातील निवडून आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचे किंवा कुटुंबातील सदस्याने केलेल्या अतिक्रमणासाठी ती व्यक्ती अपात्र ठरविली जाऊ शकत नाही, या निर्णयाचा आधार घेत सरपंच गांगुर्डे व सदस्य पवार यांच्या बाजूने अॅड. अन्वर पठाण यांनी युक्तिवाद केला. विरोधी पक्षाच्या वतीने अॅड. जे. के. गुंजाळ यांनी काम बघितले. (वार्ताहर)