गोदास्वच्छतेसाठी सरसावली ‘दक्षता’
By admin | Published: October 25, 2015 11:24 PM2015-10-25T23:24:13+5:302015-10-25T23:37:40+5:30
जनसहभाग हवा : पाणवेली काढण्यास प्रारंभ
नाशिक : गोदापात्रात निर्माल्य व प्लास्टिकचा कचरा आणि सांडपाणी मिसळत असल्यामुळे पुन्हा गोदावरीच्या पाण्याला हिरवागार रंग आणि पाणवेलींचा विळखा पडू लागला आहे. यामुळे पात्र जणू हिरवाई बहरल्याचे चित्र दिसत असल्याने वेगाने नदी प्रदूषण होत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षता अभियानाच्या वतीने रविवारी (दि.२५) गोदा स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
महापालिकेच्या वतीने निर्माल्य संकलन बोट अर्थात पाण्यावरील घंटागाडीला स्थगिती देण्यात आल्याने गोदापात्रात पुन्हा पाणवेली वाढू लागल्या आहेत. सदर बाब लक्षात घेऊन पुन्हा माजी नगरसेवक विक्रांत मते यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता अभियानाच्या माध्यमातून गोदा स्वच्छता मोहिमेला आनंदवल्ली पुलाजवळून प्रारंभ करण्यात आला.
सिंहस्थ कुंभमेळा आटोपल्यानंतर गोदास्वच्छतेकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले असून, गोदाकाठालगतचा कचरादेखील नियमितपणे उचलला जात नसल्याने अस्वच्छता वाढत आहे. त्याचप्रमाणे नदीपात्रातदेखील पाणवेलींचा पसारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. वेळीच पाणवेली काढण्यास सुरुवात न झाल्यास पाणवेलींचा विळखा पात्राभोवती अधिक घट्ट होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे महापालिकेने तत्काळ निर्माल्य संकलन बोट सुरू करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
दक्षता अभियानाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या गोदावरी स्वच्छता मोहिमेप्रसंगी शशिकांत टर्ले, डॉ. सोपान एरंडे, अंबादास तांबे, बापू मानकर, प्रताप देशमुख, जयंत खांदवे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)