अर्भक मृत्यू प्रकरणी वैद्यकीय विभागाची सारवासारव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:38 AM2017-12-21T00:38:35+5:302017-12-21T00:39:02+5:30
पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच नवजात अर्भक दगावल्याचा आरोप करत मृत अर्भक थेट महापालिका मुख्यालयात घेऊन येण्याची घटना मंगळवारी घडल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सारवासारव चालविली असून, बचावाची भूमिका घेतली जात आहे. मात्र, महापौरांनी आयुक्तांची भेट घेत या साºया प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अतिरिक्त आयुक्त व वैद्यकीय अधीक्षकांकडून चौकशीचा अहवाल मागविला आहे.
नाशिक : पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच नवजात अर्भक दगावल्याचा आरोप करत मृत अर्भक थेट महापालिका मुख्यालयात घेऊन येण्याची घटना मंगळवारी घडल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सारवासारव चालविली असून, बचावाची भूमिका घेतली जात आहे. मात्र, महापौरांनी आयुक्तांची भेट घेत या साºया प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अतिरिक्त आयुक्त व वैद्यकीय अधीक्षकांकडून चौकशीचा अहवाल मागविला आहे. इंदिरा गांधी रुग्णालयात आशा तांदळे या गर्भवती महिलेला प्रसूतीकळा येत असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने नवजात अर्भक दगावल्याचा आरोप तिच्या पतीसह आईने केला होता. याशिवाय, सदर महिलेच्या आईने मृत अर्भक घेऊन महापालिका मुख्यालय गाठले होते आणि अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावरच मृत अर्भक ठेवत कारवाईची मागणी केली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, डॉ. भंडारी यांनी बुधवारी (दि.२०) पत्रकारांशी बोलताना या साºया प्रकरणाबाबत बचावाची भूमिका घेतली आणि अतिशयोक्तीपूर्ण विधाने करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन या गंभीर प्रकरणाबद्दल सखोल चौकशी होऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी सांगितले, या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असून, अतिरिक्त आयुक्त व वैद्यकीय अधीक्षकांकडून सविस्तर चौकशी अहवाल मागविण्यात आला आहे.
मग बिल का घेतले?
महापालिकेने शताब्दी हॉस्पिटलमध्येच बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचबरोबर, राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ मिळावा म्हणून शताब्दी हॉस्पिटलची शिफारस करण्यात आली असेल तर शताब्दी हॉस्पिटलचे बाळाच्या उपचाराचे १२ हजाराचे बिल कशासाठी घेतले, असा एक प्रश्न उपस्थित होत आहे. जीवनदायी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संबंधिताने हॉस्पिटलमध्ये नोंदणी करणे आवश्यक असते. परंतु, अशी नोंदणी हॉस्पिटलने का करून घेतली नाही, असाही सवाल उपस्थित होतो.