निफाड तालुक्यातील देवगावच्या ‘सर्वेश’ची पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत उंच उडी!
By धनंजय रिसोडकर | Published: July 4, 2024 03:33 PM2024-07-04T15:33:28+5:302024-07-04T15:35:31+5:30
सध्या भारतीय लष्करात सेवेत असलेल्या सर्वेशने उंच उडीत थेट ऑलिम्पिकची पात्रता गाठली असून, अशी किमया करणारा तो नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील पहिलाच उंच उडीपटू ठरला आहे.
नाशिक : निफाड तालुक्यातील देवगावचा रहिवासी असलेल्या सर्वेश अनिल कुशारे याची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडीसाठी निवड झाली आहे. हरयाणातील पंचकुलात झालेल्या स्पर्धेत सर्वेशने २.२५ मीटर (सुमारे ७ फूट ३८ मिमी) इतकी उंच उडी मारत प्रथम क्रमांक पटकावतानाच पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठली आहे. सध्या भारतीय लष्करात सेवेत असलेल्या सर्वेशने उंच उडीत थेट ऑलिम्पिकची पात्रता गाठली असून, अशी किमया करणारा तो नाशिक जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील पहिलाच उंच उडीपटू ठरला आहे.
ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी २.२४ मीटर उडी ही पात्रतेची असताना त्यापेक्षाही अधिक उडी मारत सर्वेशने जागतिक क्रमवारीतही ४२व्या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी आलेल्या दिल्लीच्या नाशिकच्या सर्वेशचा उंच उडीतील प्रवास अत्यंत संघर्षमय असल्याने त्याने थेट ऑलिम्पिकपर्यंत धडक मारणे, ही खूप मोठी अचिव्हमेंट ठरली आहे. अत्याधुनिक मॅटसह सोयीसुविधांचा अभाव असल्याने देवगावमध्ये काही वर्षे सराव केल्यानंतर दुखापत होऊ नये, यासाठी सोयीसुविधा असणाऱ्या महाविद्यालयाचा शोध घेतला. महाविद्यालयीन जीवनासाठी सर्वेशने थेट सांगलीतील कॉलेजलादेखील प्रवेश घेतला होता. मात्र, अनेक बाबींमध्ये पुरेसे सहकार्य न मिळाल्याने सर्वेशने पुन्हा नाशिक जिल्ह्यातील देवगावची वाट धरत घराच्या शेतातच मक्याच्या भुशाच्या पोत्यांनाच मॅट बनवत त्यावरच सराव करत राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले होते.
सर्वेशची यापूर्वीची लक्षवेधी कामगिरी
सर्वेशने यापूर्वी गुजरातला २०२२ मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २.२७ मीटर उडीसह सुवर्ण पटकावले होते. त्याशिवाय थायलंड देशातील बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई गेम्स स्पर्धेतही २.२६ मीटर उडी मारत पदके पटकावली होती. गत महिन्यात कझाकिस्तानमध्येदेखील २.२५ मीटर उडी मारत सुवर्णपदक पटकावले हाते. तर २०२० मध्ये नेपाळला झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
तब्बल १४ वर्षांनी प्रयत्न फळाला
देवगावच्या डी. आर. भोसले विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेत असताना सर्वेशला क्रीडा शिक्षक रावसाहेब जाधव यांनी २०१० पासून प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला. कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नसण्याच्या काळात प्रशिक्षक जाधव यांनी सर्वेशसाठी मक्याच्या भुशाच्या पोत्यावर प्रारंभीची काही वर्षे सराव केला होता. फॉसबरी प्रकारची उडी मारण्याच्या सरावावर सर्वेशने २०१२ पासूनच स्थानिक, जिल्हा, राज्य स्पर्धांमध्ये चमक दाखविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सरावाला प्रारंभ केल्यापासून तब्बल १४ वर्षांनंतर ऑलिम्पिक पात्रतेपर्यंत धडक मारण्याचे प्रयत्न फळाला आले आहेत.
सर्वेश कुशारे याबाबत म्हणाला की, "या स्पर्धेत माझ्या शरीराने चांगली साथ दिली असली तरी पायाचा घोटा थोडासा दुखत होता. त्यामुळे २.२५ मीटर उडी मारू शकल्याचे समाधान आहे. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेतही मी २.२७ मीटरचे ध्येय गाठले होते. आतादेखील २.३० मीटरसाठी करत असलो तरी तेवढी उडी मारता आली नाही. मात्र, ऑलिम्पिकपर्यंत अजून चांगला प्रयास करून अधिक चांगल्या कामगिरीची नोंद करू शकेन, असा विश्वास आहे".