अध्यक्षपदासाठी सासणेंचे नाव आघाडीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:25+5:302021-01-17T04:13:25+5:30

नाशिक : मार्च महिन्यात नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या चर्चेने आता जोर पकडला आहे. ...

Sasane's name on the forefront for the post of President! | अध्यक्षपदासाठी सासणेंचे नाव आघाडीवर !

अध्यक्षपदासाठी सासणेंचे नाव आघाडीवर !

Next

नाशिक : मार्च महिन्यात नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या चर्चेने आता जोर पकडला आहे. साहित्यिक वर्तुळात सध्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे नाव आघाडीवर असून, कृतीशील लेखक अनिल अवचट यांच्या नावाच्या चर्चेलादेखील बहर आलेला आहे.

नाशिकला होणाऱ्या तिसऱ्या साहित्य संमेलनासाठीचा अध्यक्ष नक्की कोण असणार, याबाबतचा अंतिम निर्णय २४ जानेवारीलाच जाहीर केला जाणार आहे. त्याआधी १९ जानेवारीपर्यंत साहित्य महामंडळाच्या सर्व विभागीय कार्यालयांमधून संबंधित विभागांतील अग्रणी साहित्यिकांची नावे पाठवली जाणार आहेत. त्यानंतर २३ जानेवारीला सर्व विभागीय प्रतिनिधी आणि महामंडळाच्या अध्यक्षांच्या बैठकीत संबंधित नावांवर चर्चा आणि विचारविनिमय करुन निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अधिकृत घोषणेसाठी अजून आठवडाभरापेक्षा अधिक कालावधी लागणार असला तरी भारत सासणे की अनिल अवचट याचीच चर्चा साहित्य वर्तुळात अधिक रंगली आहे.

१९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नवकथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या कथांतून ग्रामीण, आदिवासी, नागर असे समाजजीवनाचे विविध स्तर व त्या सामाजिक परिसरात जगणारी, वैशिष्ट्यपूर्ण स्वभावधर्म असणारी नानाविध माणसे उलगडतात. माणसाच्या जगण्यातील मूलभूत, जटील व गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या अनेकपदरी पैलूंचा सखोल व उत्कट वेध घेऊन नितांत गांभीर्याने लेखन करणाऱ्या मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे यांचे नाव अग्रगण्य आहे. विविध शासकीय अधिकारी पदांवर नोकरी करुनही आपल्यातील माणूस आणि लेखक त्यांनी सदैव जिवंत ठेवला आहे. त्यांच्या या अष्टपैलू कामगिरीमुळेच त्यांचे नाव सध्या अग्रभागी आहे.

तर साहित्यिक अनिल अवचट यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळेच त्यांच्या नावाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. १९६९मध्ये त्यांनी पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केले, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. आतापर्यंत त्यांची बाविसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यदेखील बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. डॉ. अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले असून, त्यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्वाकडे समाजमन आकर्षित होते. त्यामुळेच यंदाच्या संमेलनात त्यांच्या नावानेदेखील रंगत आली आहे.

इन्फो

शोभणे, शहाणे, भवाळकर, नारळीकर यांचीही चर्चा

सोशल मीडियाच्या माध्यमातून नित्यनेमाने होणाऱ्या फॉरवर्डेड मेसेजमध्ये रवींद्र शोभणे, जयंत नारळीकर यांच्या नावांचीही चर्चा आहे. तर नाशिकचे आजोळ असलेल्या तारा भवाळकर आणि नाशिक हीच कर्मभूमी असलेल्या मनोहर शहाणे यांची नावेदेखील चर्चेत आहेत. त्यांचा नाशिकशी ऋणानुबंध असल्याने नाशिकच्या भूमीत होणाऱ्या संमेलनासाठी त्यांच्या नावांबाबत आग्रह धरला जात आहे.

.

Web Title: Sasane's name on the forefront for the post of President!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.