सटाण्यात कुटुंब रंगलंय अन्नदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:36+5:302021-05-19T04:15:36+5:30
सटाणा : कठीण प्रसंगात कोण उपयोगास पडतो? असा प्रश्न अनेकदा कानावर येत असला तरी सध्या कोरोना महामारीच्या या कठीण ...
सटाणा : कठीण प्रसंगात कोण उपयोगास पडतो? असा प्रश्न अनेकदा कानावर येत असला तरी सध्या कोरोना महामारीच्या या कठीण काळात संपूर्ण भारतात लाखो नि:स्वार्थी हात मदत करण्यासाठी पुढे सरसावले आणि त्यांनी विविध प्रकारे गरजवंतांना मदत केली. कुणी कमी पैशात जेवण दिले, तर कुणी शिधा दिला. जो तो आपापल्यापरीने मदतीचा एक छोटासा प्रयत्न करीत असताना हातावर पोट असलेली व्यक्ती आपल्या कुटुंबासह शहरातील १३० रुग्णांना भोजनाचे मोफत डबे पुरवून अन्नदानात खारीचा वाटा उचलत आहे.
अहिल्यादेवी चौकात राहणारे व भेळभत्ता विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे संजय बाबूराव जाधव, त्यांची पत्नी मनीषा व मुलगा पवन यांनी कोरोनाबाधित रुग्णांना आम्ही स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे जेवण मोफत कोरोना सेंटरपर्यंत पोहोच करीत आहेत. हा त्यांचा स्तुत्य उपक्रम बघून जाधव याच्या मदतीला त्यांचे मोठे बंधू नामदेव जाधव, पत्नी मीनाबाई यांसह रोहित, सुशांत, विकी ही मुले ही धावून आले आहेत.
'या कोविड संकटात आम्ही तुमच्यासोबत आहोत. जर तुमच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली असेल तर आम्ही दुपारचे आणि रात्रीचे जेवण तुम्हाला कोरोना सेंटर, हॉस्पिटलपर्यंत पोहोचवू असा संदेश ते गरजूंपर्यंत पोहोचवित आहेत. या कुटुंबाला नाव, प्रसिद्धी किंवा फोटो प्रसिद्ध करण्याची हाव नसून ज्यांना भोजनाची गरज आहे त्यांनी ७५०७११७३०७ या क्रमांकावर संपर्क साधावा, डबा रुग्णापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आमची असे म्हणत ही अन्नसेवा सुरू आहे.
सटाणा शहरातील सिम्स हॉस्पिटल, सटाणा ग्रामीण रुग्णालय, सुप्रीम हॉस्पिटल, नामपूर रोड येथील कोविड सेंटर येथे दररोज साधारणत १३० रुग्णांना मोफत डबे पोहचविण्याचे काम सहा दिवसांपासून सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. जाधव यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
याबरोबरच अहिल्यादेवी पुतळ्यासमोरील मोकळ्या जागेत ३० ते ४० मोकाट जनावरे फिरत असतात, त्या मुक्या प्राण्यांना तीन वर्षापासून सकाळ व सायंकाळ घास (चारा)सुध्दा हा जाधव परिवार स्वखर्चाने उपलब्ध करुन देत असल्याचे सांगितले.
अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळ व स्व. दामूनाना नंदाळे मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले असता जाधव यांनी तो नम्रपणे नाकारला. मित्रमंडळाच्या आग्रह केल्याने पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्यामुळे जाधव यांनी सत्कार स्विकारला. अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळ व स्व. दामूनाना नंदाळे मित्र मंडळाचे कार्यकर्तेही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद नंदाळे, समाधान सोनवणे, बबलु नंदाळे, राजेंद्र सोनवणे, गोपी साळे,दिनेश नंदाळे, संजय पाकवार, उत्तमराव नंदाळे, नारायण नंदाळे, स्वप्नील नंदाळे, चंद्रशेखर नंदाळे,अमोल नंदाळे,पाऊभा नंदाळे आदी सत्कारप्रसंगी उपस्थित होते.
कोट...
शहरातील व तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढे येउन जाधव यांना या कामात मदत करावी. त्यांचे काम व नि:स्वार्थी सेवा मोलाची आहे. ते रुग्णांसाठी करीत असलेल्या या विशेष प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे .
- नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक, सटाणा
कोट...
समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेतून प्रेरित होऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था आपण केली. बहुतांश रुग्ण असे असतात की त्यांना कुटुंबातील सदस्यदेखील डबे द्यायला होत नाही. एकदा ॲडमिट केले की त्याकडे दुर्लक्ष केले जाते, हे मी स्वतः अनुभवले म्हणूनच आपण ही सेवा सुरु केली आहे.
- संजय जाधव, सटाणा
===Photopath===
180521\18nsk_23_18052021_13.jpg
===Caption===
संजय जाधव