सटाणा पोलिसांची अवैध व्यवसायाविरुद्ध धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 08:02 PM2018-08-03T20:02:35+5:302018-08-03T20:03:20+5:30
सटाणा : अवैध व्यवसायाविरु द्ध सटाणा पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. चौगाव शिवारात ठिकठिकाणी छापे टाकून सात गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या छापेमारीत अडीच लाख रु पयांची २२०० लिटर दारू तयार करण्याचे रसायन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक करून त्यांच्या विरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. दहा ते बाराजण फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सटाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी शुक्र वारपासून (दि.३) धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांच्या या विशेष पथकाने शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील चौगाव बारे या राखीव जंगल परिसरात ठिकठिकाणी छापे टाकले. या छाप्यात गावठी दारू तयार करणारे मोठमोठे अड्डे आढळून आले. पोलिसांनी गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करून शंभरहून अधिक ड्रम व इतर साहित्य जाळून नष्ट केले. तसेच या छाप्यात काळू गुलाब पवार याच्याकडून ७२ हजार रु पये किमतीचे ७२० लिटर रसायन जप्त केले. भालचंद्र रामचंद्र पवार याच्याकडून ३८० लिटर रसायन, केरू भावसिंग सोनवणे यांच्याकडून ३०० लिटर रसायन व दहा लिटर दारू, फुला सखाराम जाधव याच्याकडून १८० लिटर रसायन, पांडुरंग शिवमन पवार याच्याकडून २४० लिटर रसायन, प्रल्हाद शिवमन पवारकडून १८० लिटर रसायन व रवींद्र शिवमन पवार याच्याकडून १२० लिटर असे २२०० लिटर रसायन जप्त केले आहे. त्याची बाजारात अडीच लाख रु पये किंमत आहे. सटाणा पोलिसांनी प्रथमच एवढी मोठी कारवाई केली असून, सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, उपनिरीक्षक गणेश बुवा, पोलीस कर्मचारी हेमंत कदम, राजेंद्र थोरात, प्रकाश शिंदे, अतुल अहिरे, अजय महाजन, संदीप गांगुर्डे, रवींद्र कोकणी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, त्यांच्या विरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. छापेमारीत दहा ते बारा जण फरार झाले आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.