आकर्षक रांगोळी फुलांच्या तोरणने सजलेले सखींचे ‘हटके’ मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:40 PM2019-04-29T12:40:50+5:302019-04-29T12:47:56+5:30
सखी केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांचा पोशाख एकसमान, मतदान केंद्रात आककर्षक फुलांची सजावट, द्वारावर रांगोळी, सुस्वागतमचे फलक अन् झेंडू फुलांची तोरण तर कोठे स्वागतकमानी अशा आगळ्यावेगळ्या सखी केंद्र आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.
नाशिक : पोलीस कर्मचाऱ्यांपासून पोलींग एजंटपर्यंत सर्व काही कारभार सखींनी अर्थात महिलांनी सुरळितपणे पार पाडावयाचे अशा, मतदान केंद्राला ‘सखी केंद्र’ असे नाव दिले गेले आहेत. या केंद्रांवरील सर्व कारभार सखींच्या हाती जिल्हा निवडणूक आयोगाने सोपविला आहे. मतदारांची नावे शोधून नोंदी करण्यापासून तर शाई लावण्यापर्यंत सर्व कामे महिला कर्मचारीच करताना या केंद्रात पहावयास मिळत आहेत. सखी केंद्र अन्य मतदान केंद्रांपासून ‘जरा हटके’ असेच आहे.
सखी केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांचा पोशाख एकसमान, मतदान केंद्रात आककर्षक फुलांची सजावट, द्वारावर रांगोळी, सुस्वागतमचे फलक अन् झेंडू फुलांची तोरण तर कोठे स्वागतकमानी अशा आगळ्यावेगळ्या सखी केंद्र आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. शहरातील म्हसरूळच्या काकासाहेब देवधर शाळेसह अन्य चार ठिकाणी सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रांवर कारभार जरी महिलांकडून हाकला जात असला तरी त्या केंद्रांत महिला, पुरूष मतदारांना प्रवेश करून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. केंद्रातील कर्मचारी केवळ महिला आहेत, मात्र हे केंद्र महिलांप्रमाणेच पुरूष मतदारांनाही खुले आहेत.
‘वोट कर नाशिककर’ म्हणत नाशिककर मोठ्या संख्येने सोमवारी (दि.२९) मतदानासाठी पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने सरासरी १५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची नोंद निवडणूक आयोगाने केली आहे.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली आहे. शहरात प्रशासनाच्या वतीने जनजागृतीचे होर्डींग्जदेखील उभारण्यात आल्या आहेत.