साठे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
By admin | Published: February 8, 2015 01:42 AM2015-02-08T01:42:24+5:302015-02-08T01:42:55+5:30
साठे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
नाशिक : साहित्य संमेलनाला राज्य शासनाकडून २५ लाखांचे अनुदान दिले जात असताना, चित्र व शिल्पकलेची मात्र प्रचंड अवहेलना होत असल्याची खंत कल्याण येथील ज्येष्ठ शिल्पकार सदाशिव साठे यांनी व्यक्त केली. सामान्य माणसामध्ये या कलांची जाण निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
‘नाशिक कलानिकेतन’च्या वतीने आयोजित अमृतमहोत्सवी कला प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी साठे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, या सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते. पंचवीस हजार रुपये, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच यावेळी ‘कलानिकेतन’च्या वतीने आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या या कार्यक्रमात मुंबई येथील चित्रकार ज्योत्स्ना कदम, आमदार प्रा. देवयानी फरांदे, ‘कलानिकेतन’चे अध्यक्ष रघुनाथ कुलकर्णी, चिटणीस बापू गर्गे, कोषाध्यक्ष राजेंद्र ओढेकर, प्राचार्य दिनकर जानमाळी व्यासपीठावर उपस्थित होते.साठे म्हणाले की, चित्र-शिल्पकलेला सरकारकडून प्रोत्साहन मिळत नाही. काव्य, संगीत क्षेत्राप्रमाणे चित्र-शिल्पकलेची समीक्षा करणारे जाणकार समाजात नाहीत. चित्रकार नसलेली सामान्य व्यक्तीही चित्रकलेची समीक्षा करू शकेल, अशी तिची पात्रता तयार करायला हवी. समाजातील प्रत्येक व्यक्तीला या कलांची अनुभूती घेता यायला हवी. आज या कलांना दाद देणारेच कोणी नाही. ही परिस्थिती बदलली तरच या कला टिकतील. कलात्मक दृष्टिकोन नसेल, तर समाज सुधारणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पुरस्काराच्या २५ हजारांच्या रकमेत तेवढीच भर घालून ती रक्कम ‘कलानिकेतन’ला प्रदान करीत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
चित्रकार ज्योत्स्ना कदम यांनीही मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना कलेचे सौंदर्य न बिघडू देता त्यातील सात्त्विकता जपण्याचे आवाहन केले. कलेद्वारे ब्रह्मानंदाची प्राप्ती होत असल्याने स्वत:च्या नावापेक्षा दर्जेदार कलाकृती तयार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी ‘कलानिकेतन’ हे नाशिकचे भूषण असून, जागेसह अन्य मागण्या, अडचणी शासन दरबारी पोहोचवू, असे आश्वासन दिले. प्रारंभी पंकज ठाकरे व सहकाऱ्यांनी नांदी सादर केली. रघुनाथ कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र ओढेकर यांनी परिचय करून दिला. अपूर्वा शौचे-देशपांडे, अनुजा तेलंग-गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)