देवनदी प्रवाहित झाल्याने समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:17 AM2019-08-01T01:17:46+5:302019-08-01T01:18:56+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या संततधारेने उंबरदरी व कोनांबे धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. देवनदी प्रवाहित झालेल्या नदीचे पाणी छोटे-मोठे बंधारे भरत पूर्व भागातील खोपडीपर्यंत पोहचले आहे. तालुक्याच्या ठाणगाव पट्ट्यातदेखील चांगला पाऊस सुरू असून, म्हाळुंगी नदीला पाणी वाहत असल्याने भोजापूर धरण ७० टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे शेतीसह पाणीपुरवठा योजनांना जीवदान मिळाले आहे.

चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने देवनदीचे पाणी खोपडीपर्यंत पोहचले आहे. नदीवरील ब्रिटिशकालीन पाटांच्या माध्यमातून परिसरात हे पाणी फिरत असल्याने पूर्व भागातील शेतकरी सुखावला आहे. गतवर्षी या नदीचे पाणी वाहिले नसल्याने पूर्व भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र झाली होती. यंदा मात्र जुलै महिन्यातच नदी वाहती झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
पश्चिम पट्ट्यातील उंबरदरी, कोनांबे, बोरखिंड ही धरणे भरली असली तरी भोजापूर, सरदवाडी ही धरणे भरणे आवश्यक आहे. ठाणगाव आणि पट्टाकिल्ला परिसरातदेखील जोरदार पाऊस सुरू असून, या भागात उगम पावणारी म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत आहे. म्हाळुंगीच्या पाण्यामुळे भोजापूर धरणाची जलपातळी झपाट्याने वाढत असून, बुधवारी धरणातील साठा ७० टक्क्यांपर्यंत गेला होता. देवनदीमुळे परिसरातील विहिरींनाही पाणी उतरले असून, पिण्याच्या व जनावरांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. आतापर्यंत चांगला पाऊस झालेला नसला तरी या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतीसाठी समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.
सिन्नर शहराजवळ असलेले सरदवाडी धरण अर्धे भरले असून या धरणामुळे परिसरातील जामगाव, पास्ते, सरदवाडी परिसरातील शेतीला जीवदान मिळाले आहे.