जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छता पाहणीत पथकाचे समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:46+5:302021-02-06T04:25:46+5:30
नाशिक : भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून पाठविण्यात आलेल्या पथकाने जिल्हा रुग्णालयातील शिशू विभागातील स्वच्छतेची तसेच ...
नाशिक : भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून पाठविण्यात आलेल्या पथकाने जिल्हा रुग्णालयातील शिशू विभागातील स्वच्छतेची तसेच सुरक्षिततेबाबतची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.
राज्यभरातील जिल्हा रुग्णालयांची स्वच्छता आणि सुरक्षितता पाहणी करण्यात येत आहे. राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत एक अधिकारी पाठवत गुरुवारी रात्री उशिरा नवजात शिशू वॉर्डाची अचानक पाहणी केली. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर राज्यभरातील रुग्णालयांमध्ये किती दक्षता घेतली जात आहे, तसेच स्वच्छतेबाबतच्या निकषांचे पालन होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी आरोग्य विभागाची विविध पथकांनी गुरुवारी सायंकाळपासून अचानकपणे पाहणी करण्यास प्रारंभ केला. आरोग्य संचालकांनी त्यासाठी तयार केलेल्या स्वतंत्र पथकाने नवजात शिशू कक्षास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी कक्षामध्ये परिचारिका, कर्मचारी, डाॅक्टर हजर असल्याचे दिसून आले. तसेच कक्षातील सर्व उपकरणे, उपचार आणि संबंधित तांत्रिक व वैद्यकीय बाबींची पाहणी करण्यात आली. मात्र, त्यांना त्यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या नाहीत. या विभागातील सर्व बाबी योग्य असून, त्यात त्रुटी आढळून न आल्याचे पथकाने त्यांच्या पाहणीनंतर दिलेल्या अहवालात म्हटले असल्याचे जिल्हा रुग्णालयातील सूत्रांकडून समजते.