समाधानकारक पावसाने शेतीकामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 05:13 PM2021-07-17T17:13:35+5:302021-07-17T17:14:24+5:30
देवगाव : जून महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर पावसाने बरेच दिवस दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याच्या ...
देवगाव : जून महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर पावसाने बरेच दिवस दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. रोहिणींच्या सरीने बळीराजाला दिलासा मिळून त्या जोरावर शेतकऱ्यांनी भात, नागली वरईची पेरणी केली. मात्र, पुढील पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक न कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला होता. मात्र, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच रिपरिप व मध्यम स्वरूपाच्या बरसणाऱ्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी समाधानी झाले आहेत.
तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आवणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने व सगळ्यांनीच एकदाच शेतीकामांना सुरुवात केल्याने अनेक शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने शेतीची कामे काहीशा संथ गतीने सुरू आहेत. वेळेत मजूर न मिळाल्यास भात लावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची चिंता बळीराजा करत आहे. म्हणून घरातील उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून आवणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावसह परिसरातील वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, श्रीघाट,चंद्राचीमेट, डहाळेवाडी, टाकेहर्षे या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे आवणीच्या कामाला सुरुवात झाली असून, मजूरटंचाईमुळे शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव, वांजळे, कोरोळे या भागातून शेतकरी देवगाव परिसरातील वाडीपाड्यांमधील मजूर घेऊन जात असल्यामुळे मजुरांची उणीव भासत आहे. त्यात दरवर्षीच्या तुलनेत मजुरीवाढ केल्याने बळीराजा चिंतित आहे. मजुरांचा दरदिवसाला २५० रुपये रोज होता; परंतू, लॉकडाऊनच्या काळात मजूर मिळत नसल्याने ३०० रुपये मजुरांची मजुरी झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मजुरीवाढीने हवालदिल झाला असून घरच्या उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने शेतीकामांवर जोर दिला आहे.
बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे खोळंबली होती. मात्र, आता काहीसा समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी लावणीची कामे हाती घेतल्यामुळे मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे घरातील उपलब्ध मनुष्यबळावर लावणीचे काम हाती घेतले आहे.
- खंडू देहाडे, शेतकरी, अस्वलीहर्ष