शौचालय बांधणीत सातपूर विभाग अग्रेसर
By Admin | Published: August 21, 2016 11:32 PM2016-08-21T23:32:48+5:302016-08-21T23:41:30+5:30
स्वच्छता अभियान : ८६३ पूर्ण, तर ६३३ प्रगतिपथावर; हगणदारीमुक्तच्या दिशेने प्रयत्न सुरू
गोकुळ सोनवणे सातपूर
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीत अन्य विभागांपेक्षा आघाडी घेऊन सातपूर हगणदारीमुक्तच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. सातपूर विभागासाठी असलेल्या उद्दिष्टांनुसार १६०३ पैकी ८६३ शौचालय पूर्ण झाले असून, ६३३ शौचालयांचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र ही योजना राबविताना अनेक ठिकाणी बांधण्यात आलेल्या शौचालयांना आउटलेटची सोयच नसल्याने बांधण्यात आलेल्या अशा शौचालयांचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सातपूर परिसरातील काही भागांतील (विशेषत: झोपडपट्टीत) घरांमध्ये शौचालय नसल्याने तेथील नागरिक, महिला रस्त्याच्या कडेला उघड्यावर शौचास बसत असतात. उघड्यावर शौचास बसू नये म्हणून महापालिकेच्या वतीने जनजागृती आणि उपाय योजना करण्यात येत होत्या, परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागाप्रमाणे सातपूरलादेखील हगणदारीमुक्त योजना राबविण्याची मागणी होत होती.
केंद्रशासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरात शौचालय नसलेल्या नागरिकांसाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सातपूर परिसरातील ज्या नागरिकांच्या घरात शौचालय नाहीत अशा नागरिकांच्या घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. जवळपास साडेचार हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि पात्र नागरिकांचे अहवाल स्वच्छ भारत अभियानाकडे पाठविण्यात आले होते. यात १६०३ लाभपात्र व्यक्ती निश्चित करण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी सातपूरचे विभागीय स्वछता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्यावर सोपविण्यात आली होती.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आलेल्या प्रस्तावानुसार ज्या नागरिकांचे स्वत:चे घर आहे.आणि शौचालय बांधण्यासाठी जागा आहे. अशा लाभार्थींना बारा हजारांपैकी सहा हजार रु पयांचा पहिला हप्ता देण्यात आला. त्या पैशातून घराजवळ शौचालय बांधायला सुरु वात झाली.अर्धवट बांधकाम केलेल्या कामाचे छायाचित्र सादर केल्यानंतर उर्वरित हप्ता अदा करण्यात आला. अशा पद्धतीने शौचालयाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. शौचालय बांधकामावर निरीक्षणाची जबाबदारी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. १६०३ पैकी ८६३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले. ६३३ शौचालयांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे, तर १०७ शौचालये तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण होऊ शकलेले नाहीत. महाराष्ट्र शासनाअंतर्गत संत गाडगे महाराज स्वछता अभियानाचे दोन पुरस्कार सातपूर विभागाला मिळालेले आहेत. शौचालयाची ही योजना लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे आणि महापालिकेच्या जनजागृतीमुळे यशस्वी होऊ शकली आहे. शहरात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे, मात्र सातपूर विभाग ही योजना राबविण्यात अग्रेसर राहिला आहे.