सातपूरला सप्तशृंगी देवीचा यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:34 AM2019-09-30T00:34:39+5:302019-09-30T00:34:55+5:30
सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवास सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या माळेपासून सुरुवात होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्ताने परिसरातून देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
सातपूर : सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवास सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या माळेपासून सुरुवात होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्ताने परिसरातून देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी देवी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सजावटदेखील करण्यात आली आहे. देवीच्या विविध मोहक रूपांचे दर्शन भाविकांना मिळणार आहे. शिवाय दहा दिवस धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वस्त समितीचे अध्यक्ष लोकेश गवळी तसेच चिंधू ढाके, विजय शिरसाठ, प्रकाश चौधरी, मधुकर आहेर, टी. सी. जाधव, अंबादास ठोंबरे, प्रभाकर शिरसाठ, भाऊसाहेब भादेकर, ज्ञानेश्वर भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ आदींसह पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
राधाकृष्णनगरातील रेणुकामाता मंदिरातदेखील नवरात्रोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस विविध धार्मिक उपक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सातपूर परिसरातील संतोषीमाता टेकडीवरील ग्रामदेवता सप्तशृंगी देवी मंदिर, सातपूर गावातील देवी मंदिर यांसह परिसरातील ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील ४६ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून घटस्थापना करण्यात आली आहे.
परिसरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी महाराष्ट्रातील शक्तिपीठे असलेल्या देवस्थानाहून पायी ज्योत आणली आहे. घराघरांमध्येही मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना केली आहे.