सुखप्राप्तीसाठी सत्संग आवश्यक: महंत स्वामी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:15 AM2017-11-12T01:15:32+5:302017-11-12T01:19:03+5:30
आपल्या सभोवताली कोणीही सुखी असल्याचे आढळत नाहीत. सुखाच्या प्राप्तीसाठी मंदिर आणि सत्संगांची आवश्यकता असून, केवडीबन येथे साकारण्यात येणारे बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे मंदिर महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांनी शनिवारी (दि. ११) शिलान्यास सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.
नाशिक : आपल्या सभोवताली कोणीही सुखी असल्याचे आढळत नाहीत. सुखाच्या प्राप्तीसाठी मंदिर आणि सत्संगांची आवश्यकता असून, केवडीबन येथे साकारण्यात येणारे बीएपीएस स्वामी नारायण संस्थेचे मंदिर महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांनी शनिवारी (दि. ११) शिलान्यास सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. पंचवटी परिसरातील तपोवन (केवडीबन) येथे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस) यांच्यातर्फे भगवान स्वामीनारायण यांचे भव्य शिखरबद्ध मंदिर साकारण्यात येणार असून, शनिवारी या मंदिराचा शिलापूजन विधी संस्थेचे सहावे आध्यात्मिक गुरू ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन करताना महंत स्वामी महाराज यांनी जे भक्त या मंदिरात येऊन देवाची आराधना करतील तसेच नियमात राहून आपले जीवन व्यतित करतील त्यांना निश्चितच शाश्वत सुखाचा आनंद प्राप्त होईल, असे सांगितले. यावेळी ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांच्यासह वरिष्ठ संत यांच्या प्रमुख उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चाराने शिलापूजन करण्यात आले. शिलापूजन विधीसाठी देशभरातून अनेक भक्त याठिकाणी दाखल झाले होते. यावेळी उपस्थित हजारो भक्तांना छोट्या आकारातील शिला देऊन पारंपरिक पद्धतीने महंत स्वामी महाराज तसेच वरिष्ठ संत यांच्या प्रमुख उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चारात हा विधी संपन्न झाला. या कार्यक्रमास उपस्थित राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनता सुखी आणि समृद्धी रहावी यासाठी संस्थेने फक्त मंदिराची उभारणी न करता समाजोपयोगी शाळा, वसतिगृह, रुग्णालयांची निर्मिती करण्यात येते हा चांगला उपक्रम असून, यामुळे संस्कार आणि संस्कृती या दोघांचे जतन होत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांचीदेखील विशेष उपस्थिती होती.
अशी आहे ‘बीएपीएस’ संस्था
ब्रह्मस्वरूप शास्त्री महाराज यांनी १९०७ साली बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेची (बीएपीएस) स्थापना केली. भगवान स्वामी नारायण यांच्या वैदिक आदर्शांना केंद्रस्थानी ठेवून या संप्रदायाच्या कार्याला प्रवाहित केले आहे. आज या संप्रदायाचे कार्य नऊ हजारांहून अधिक सत्संगाद्वारे संपूर्ण जगभरात सुरू आहे. यामध्ये संस्कारधाम, मंदिरनिर्मिती, बालसंस्कार, युवा युवती संस्कार, महिला कल्याण केंद्र आणि सत्संग केंद्र अशा विविध कार्यांचा समावेश आहे.