सौंदाणे ग्रामपंचायत देणार ‘अखेरची फुलं’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:55+5:302020-12-12T04:31:55+5:30
मालेगाव : राज्यातील ग्रामपंचायती आपापल्या गावात विविध उपक्रम राबवत असतात. काही ग्रामपंचायती मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतात, तर काही ग्रामपंचायती ...
मालेगाव : राज्यातील ग्रामपंचायती आपापल्या गावात विविध उपक्रम राबवत असतात. काही ग्रामपंचायती मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतात, तर काही ग्रामपंचायती कर भरण्यासाठी ग्रामस्थांना आकर्षित करण्यासाठी अनेकविध योजना जाहीर करीत असतात. तालुक्यातील सौंदाणे ग्रामपंचायतीनेही गावातील ग्रामस्थाच्या अखेरच्या प्रवासात फुले वाहून आपला वाटा उचलला असून, ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
सौंदाणे ग्रामपंचायतीमार्फत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अखेरची फुलं गावाची’ अशी अभिनव योजना साकारण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गावातील दगावलेल्या ग्रामस्थाच्या अखेरच्या प्रवासात त्याच्या अंत्यविधीसाठी लागणारा खर्चदेखील ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीने कमकुवत व गरीब अशा कुटुंबातील व्यक्ती दगावल्यास त्यांच्यापुढे दिवंगत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या खर्चाचा प्रश्न उभा राहतो. पैसे नसल्याने गावातून अथवा नातलगांकडून पैसे जमा करावे लागत. आर्थिक ताळमेळ जुळविताना संबंधित कुटुंबाच्या नाकीनऊ येत.
सौंदाणे ग्रामपंचायतीतर्फे नव्या वर्षात १ जानेवारी २०२१ पासून ग्रामपंचायत कार्यालयात येऊन दगावलेल्या व्यक्तीची नावनोंदणी करावी लागणार असून, ग्रामपंचायतीला अर्ज भरून द्यावा लागणार आहे. हा अर्ज घेऊन दुकानदाराकडे जावे लागेल. ग्रामपंचायतीकडून अकरा नारळ, सुतळी, अगरबत्ती पुडा, गुलाल, अत्तर, साबण, मध, दोन खोबरेवाट्या, तूप पाच किलो, खोबरेल तेल, कुंकू, कापूर डबी, मुरमुरे, काडीपेटी आणि मेणबत्ती इतके साहित्य ग्रामपंचायत देणार आहे. दुकानापासून ते अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंतचा वाहतूक खर्च मात्र मृताच्या नातलगांना करावा लागणार आहे. त्यासाठी फक्त व्यक्ती ग्रामपंचायतीची थकबाकीदार नको, अशी अट असल्याचे सरपंच डॉ. मिलिंद पवार यांनी सांगितले.