स्वामी जाधवचा संघर्ष : दानशूरांच्या मदतीची प्रतीक्षा बोन मॅरो आजाराने ग्रस्त खेळाडूला हवे साहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:23 AM2017-07-30T01:23:51+5:302017-07-30T01:24:03+5:30
मराठा हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकणारा आणि आंतरराष्टÑीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदकासह फुटबॉल खेळातही प्रावीण्य मिळविलेला गुणी खेळाडू स्वामी अविनाश जाधव (१४) हा बोन मॅरोच्या आजाराशी सध्या रुग्णालयात लढा देत असून, त्याच्यावर मुंबईत अवघड शस्त्रक्रिया केली जाणार असल्याने आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे.
नाशिक : मराठा हायस्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकणारा आणि आंतरराष्टÑीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदकासह फुटबॉल खेळातही प्रावीण्य मिळविलेला गुणी खेळाडू स्वामी अविनाश जाधव (१४) हा बोन मॅरोच्या आजाराशी सध्या रुग्णालयात लढा देत असून, त्याच्यावर मुंबईत अवघड शस्त्रक्रिया केली जाणार असल्याने आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे. स्वामी जाधव हा गेल्या तीन महिन्यांपासून अंथरुणाला खिळून आहे. बोन मॅरो आजारामुळे स्वामी याला दर दोन दिवसांनी पांढºया रक्तपेशी द्याव्या लागत असून, पांढºया रक्तपेशींची संख्या कमी झाल्यामुळे त्याची रोगप्रतिकारशक्तीही खालावत चाललेली आहे. अपंग असलेल्या त्याच्या वडिलांनी स्वामीच्या उपचारासाठी कष्ट घेतले. कर्जही उचलले. घरातील दागदागिनेही विकण्याची वेळ आली. परंतु, स्वामीवर पूर्णपणे उपचार होऊ शकलेले नाहीत. स्वामीवर मुंबईत बोन मॅरो ट्रान्सप्लांटची अवघड शस्त्रक्रिया केली जाणार असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे. स्वामीच्या आजारावरील उपचारावर आतापर्यंत सुमारे ३० लाखांहून अधिक खर्च झाला आहे. पुढील उपचारासाठी आणखी तेवढ्याच रकमेची आवश्यकता भासणार आहे. कर्जाचा डोंगर असलेल्या जाधव कुटुंबीयांना एवढी रक्कम खर्च करणे शक्य नसल्याने ते हतबल झाले आहेत. स्वामीचे वडील हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत. पोलीस विभागातील सहकाºयांनी त्यांना एक दिवसाचे वेतन देऊन मदत केली आहे. परंतु, खर्चाचा भार वाढत चालला आहे. त्यामुळे दानशूरांनी या गुणी खेळाडूला जीवनदान देण्यासाठी आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.