सावाना असो प्रतिष्ठान... नको रे ‘बाप्पा’

By admin | Published: September 7, 2014 12:31 AM2014-09-07T00:31:04+5:302014-09-07T00:39:26+5:30

सावाना असो प्रतिष्ठान... नको रे ‘बाप्पा’

Savana Aas Foundation ... Do not want 'Bappa' | सावाना असो प्रतिष्ठान... नको रे ‘बाप्पा’

सावाना असो प्रतिष्ठान... नको रे ‘बाप्पा’

Next


धनंजय वाखारे

अनंत चतुर्दशीला निरोप काही तासांवर येऊन ठेपला आणि बाप्पाची अस्वस्थता वाढत गेली. उत्सवकाळात आपल्या पुढ्यात दानपेटीत जमा झालेली रक्कम मंडळाचे कार्यकर्ते सत्कारणी लावतील की नाही, या चिंतेने बाप्पाला ग्रासले. जमलेली रक्कम आर्थिक निकड असलेल्या सामाजिक-सांस्कृतिक संस्थांना आपणच का वाटू नये, असा विचार बाप्पाच्या मनी डोकावला आणि बाप्पाने काही संस्थांचे आॅडिट जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम शहरातील सर्वात जुनी संस्था असलेल्या सार्वजनिक वाचनालयाकडे आपला मोर्चा वळविला.
बाप्पाने आपली मूषकमॉडेल दुचाकी वाचनालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पार्क केली आणि बाप्पाला पाहताच फुलविक्रेत्याजवळ खुर्ची टाकून बसलेल्या माजी अध्यक्षाने विक्रेत्याच्या टोपलीत हात घालून एक गुलाबपुष्प बाप्पाच्या हाती टेकवत ‘कसं काय येणं केलं’ म्हणत विचारणा करण्यास सुरुवात केली. अण्णांचा गप्पांचा मूड पाहून बाप्पाने स्वत:ला सावरले आणि सावानाच्या कार्यवाहांच्या कक्षाकडे धाव घेतली. नाकावरच्या शेंड्यापर्यंत येऊन अडकलेल्या चष्म्यातून भेदक नजरेने पाहत कार्यवाहांनी बाप्पाला बघितले आणि हर्षोल्हासाने उठून उभे राहत त्यांनी बाप्पाचे स्वागत केले. बाप्पाने येण्याचा हेतू कथन केला आणि आॅडिटची मागणी केली. सभासद असेल, तरच आॅडिटची प्रत दाखविता येईल, असा मुद्दा कार्यवाहांनी उपस्थित केला; परंतु बाप्पाचा हेतू पाहून आणि माहिती अधिकाराचे नस्ते लफडे नसल्याचे बघून कार्यवाहांनी आॅडिटची प्रत ग्रंथपालांकडून मागविली. सार्वजनिक वाचनालय पुढील वर्षी शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त अनेकविध उपक्रम राबवायचे आहेत. मोठा सोहळा साजरा करण्याचे नियोजन आहे. मान्यवरांना निमंत्रित करायचे आहे... असा पाढा कार्यवाहांनी वाचायला सुरुवात केली, तेव्हा बाप्पाने त्यांना मध्येच थांबवत या सोहळा-समारंभासाठी, पदाधिकाऱ्यांच्या मिरवणुकीसाठी मी तुम्हाला पैसे देऊ शकत नसल्याचे सांगून टाकले. पुस्तकांची खरेदी आणि उपलब्ध पुस्तकांच्या जपणुकीसाठी तुम्ही काय करणार आहात, तेवढे बोला... असा सवाल बाप्पाने कार्यवाहांना केला. पुस्तकांसंबंधीच्या प्रश्नामुळे बाप्पाचे कान विरोधकांनी फुंकले की काय, असे क्षणभर कार्यवाहांना वाटले. पुस्तकखरेदीची कशीबशी माहिती देत कार्यवाहांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने बाप्पाचे काही समाधान झाले नाही. ‘विचार करून सांगतो’ असे म्हणत बाप्पा वाचनालयातून बाहेर पडले तेव्हा पुन्हा माजी अध्यक्ष आडवे आले आणि बाप्पासमोर गाऱ्हाणं मांडू लागले. एकूणच प्रकरण पाहून येथे काही खरं दिसत नाही, त्यामुळेच देणगीदार वाचनालयात यायला कचरत असल्याची खात्री बाप्पाला मनोमन पटली. बाप्पाने मूषकदुचाकीला किक मारत गंगापूररोडचा रस्ता धरला. विद्याविकास सर्कलवर वळसा घालून कुसुमाग्रज स्मारकाकडे बाप्पा निघाले, पण स्मारकातील पार्किंगस्थळी जाताना समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला आणि बाप्पा कोलमडले. थोडेसे खरचटले. अंग झटकून बाप्पाने वाहन कसेबसे स्मारकाच्या पार्किंगमध्ये लावले आणि कार्यालयाकडे निघाले. विशाखा दालनासमोरच चमचमता झब्बा-पायजमा घातलेल्या दोन-तीन माणसांनी बाप्पाचे स्वागत केले आणि कार्यक्रम विशाखा सभागृहात सुरू असल्याची कल्पना दिली. त्यातीलच एकाने बाप्पाचा हात पकडून त्यांना सभागृहातील पाठीमागील एका खुर्चीवर बसविलेही; परंतु समोर स्टेजवर लहान बाळासाठी सजविलेला पाळणा पाहून बाप्पाला काहीतरी चुकते आहे, याची जाणीव झाली आणि बाप्पाने शेजारीच बसलेल्या एकाला कार्यालय कुठे आहे, याची विचारणा केली. बाप्पाने बाहेर येऊन शेजारीच असलेल्या कार्यालयात प्रवेश केला. समोर एकजण मोदींसारखे जॅकेट घालून ग्रंथपेट्यांचा हिशेब करत बसला होता, तर दोघे-तिघेजण केबिनमधील सोफ्यावर बसून गप्पांत रंगले होते. बाप्पाने जॅकेटवाल्याला त्याचे नाव विचारले तेव्हा याने तर आपलेच नाव धारण केल्याचे बाप्पाच्या लक्षात आले. ‘काय रे, माझ्या नावाचा काही गैरवापर तर करत नाही ना?’ असे मिश्किलपणाने बाप्पाने जॅकेटवाल्याला विचारलेही. ग्रंथपेट्यांच्या हिशेबात गुरफटलेल्या जॅकेटवाल्याने भानावर येत बाप्पाचे स्वागत केले आणि समोरच्या खुर्चीवर बसविले. बाप्पाने आपला हेतू कथन केला आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानची आॅडिटची प्रत मागितली. मी नावाला विश्वस्त. आपल्याला येथे काही अधिकार नाही, असे सांगत जॅकेटवाल्याने लगेच कार्यवाहांना फोन लावत बाप्पाच्या आगमनाची व त्यांनी केलेल्या मागणीची माहिती दिली. कार्यवाहांनी तासाभराने येतो तोपर्यंत बाप्पाला बसवून ठेव, असे सांगत फोन बंद केला. जॅकेटवाल्याची पुन्हा अडचण झाली. तासभर बाप्पाचा टाइमपास कसा करावा, या विचारात असतानाच जॅकेटवाल्याने दुबईपासून जव्हारच्या आदिवासी पाड्यापर्यंत ग्रंथपेट्या कशा-कशा पोहोचविल्या याची माहिती दिली आणि तुम्हीही तुमच्या नावाने काही पेट्या द्या, असा आग्रह धरला. त्यासाठी तुमच्या वाढदिवसाला अनेकांचे शुभेच्छापर फोन येतील, याची तजवीज मी करतो, असे आमिषही दाखविले. ग्रंथपेटीचे कौतुक ऐकता-ऐकता दीड तास निघून गेला आणि कार्यवाह कार्यालयात अवतरले. जॅकेटवाल्याने बाप्पाची ओळख करून दिली. कारण, कार्यवाह पडले नास्तिक. त्यांनी कधी बाप्पाला पाहिलेच नव्हते. बाप्पाने येण्याचा हेतू सांगितला तेव्हा कार्यवाहांनी प्रतिष्ठानला पैशांची खूप गरज असल्याचे सांगत श्रीराम बॅँकेत अडकलेल्या ठेवींपासून ते महापालिकेच्या थकलेल्या घरपट्टीपर्यंतची व्यथा ऐकविली. बाप्पांनी शांतपणे ऐकून घेतले आणि ताडकन् उठून चालू लागले. हातचं गिऱ्हाईक चालू लागल्याचे पाहून कार्यवाहांनी बाप्पाचे पितांबर पकडले आणि पुढच्या वर्षी प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सानिमित्त एखाद्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व तुम्ही घ्या, असा आग्रह धरला. काय द्यायचे ते आता देवलोकात तात्यासाहेबांच्याच हाती सुपुर्द करतो, असे सांगत बाप्पा कौलारू प्रवेशद्वारातून बाहेर पडले. शहरात सामाजिक-सांस्कृतिक संस्था आहेत; परंतु त्या त्यांच्या मूळ उद्देशापासून बाजूलाच पडल्याचे बाप्पाला जाणवले आणि कुणाला काहीही न देण्याचा निर्धार पक्का करत बाप्पा आल्या पावली परत आसनस्थ झाले, ते दुसऱ्या दिवशी निरोपाची प्रतीक्षा करत...!

Web Title: Savana Aas Foundation ... Do not want 'Bappa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.