शनिवार पासून सावानाचा जिल्हा साहित्यिक मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 07:11 PM2017-09-16T19:11:55+5:302017-09-16T19:12:00+5:30

Savana district literary meet from Saturday | शनिवार पासून सावानाचा जिल्हा साहित्यिक मेळावा

शनिवार पासून सावानाचा जिल्हा साहित्यिक मेळावा

Next


नाशिक : १७५ वर्षांपेक्षा प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचा ५० वा जिल्हा साहित्यिक मेळावा शनिवार (दि. २३) पासून सुरू होणार असल्याची माहिती सावानातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दोन दिवस चालणा-या या साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षपदी नाट्यलेखक दत्ता पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
शनिवार (दि. २३) आणि रविवार (दि. २४) या दोन दिवसीय साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते होणार असून या महोत्सवाची सुरूवात ग्रंथदिंडीने होणार आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता त्र्यंबकरोड येथील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीला सुरूवात होणार असून सकाळी ११ वाजता या साहित्य संमेलनाचे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे मोठ्या दिमाखात उद्घाटन होणार आहे. दोन दिवस चालणा-या या संमेलनात विविध विषयावरील परिसंवादासह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी संमेलनाच्या पहिल्या दिवशी दुस-या सत्रात ‘नाटक : काल, आज आणि उद्या’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यात ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे (पुणे) आणि लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते योगेश सोमण यांचा समावेश असणार आहे, तसेच यानंतर ‘कविता : काल, आज आणि उद्या’ या परिसंवादात माजी साहित्य संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांचा समावेश असणार आहे. परिसवांदानंतर जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील यांचा आतापर्यंतचा साहित्यप्रवास उलगडून दाखविणा-या स्लाईड शोचे सादरीकरण करण्यात येणार आहे तसेच मेळाव्याच्या पहिल्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात खुल्या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ कवियत्री रेखा भंडारे कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहे.
साहित्य मेळाव्याच्या दुस-या दिवसाची सुरूवात मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील यांच्या बीज भाषणाने होणार असून यानंतर ‘समाज माध्यमांचे साहित्यावर होणारे परिणाम’ या विषयावरील परिसंवादात समीक्षक मंदार भारदे (मुंबई) आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजेंद्र मलोसे (चांदवड) उपस्थित साहित्यिकांशी संवाद साधणार आहेत. दुपारच्या सत्रात साहित्यिक मेळाव्याच्या पार्श्वभुमीवर आयोजित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यानंतर गेल्या ४९ वर्षात जिल्हा साहित्यिक मेळाव्याने काय दिले ? या संवादपर कार्यक्रमातुन मान्यवर आपापले अनुभव कथन करणार आहेत.

Web Title: Savana district literary meet from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.