सावाना निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
By admin | Published: March 26, 2017 12:02 AM2017-03-26T00:02:52+5:302017-03-26T00:03:09+5:30
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी माधव भणगे यांनी शनिवारी (दि.२५) निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी माधव भणगे यांनी शनिवारी (दि.२५) निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण दिले. यावेळी मतदान कसे करावे, बुथ कसे असतील, मतपत्रिका कशा असतील याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सावानाची निवडणूक कार्यक्रमानुसार २ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी एकूण ४० कर्मचारी व अधिकारी काम करणार असून, यातील सुमारे ३० ते ३५ जणांनी या प्रशिक्षण वर्गाला हजेरी लावली. उर्वरित अधिकारी व कर्मचारी मतदानप्र्रक्रियेत सहभागी होणार असल्याची माहिती भणगे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. भणगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानप्रक्रियेत सर्व सभासदांना सर्व जागांसाठी मतदान करणे बंधनकारक आहे. अन्यथा सभासदांचे मत बाद ठरण्याचा धोका संभवू शकतो. त्यामुळे सभासदांनी अध्यक्ष पदासाठी एक, उपाध्यक्षपदासाठी दोन व कार्यकारी मंडळ सदस्य निवडीसाठी १५ सदस्य अशा १८ उमेदवारांना मतदान करणे अपेक्षित आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी पिवळ्या रंगाची, उपाध्यक्षपदासाठी गुलाबी व कार्यकारी मंडळ सदस्यपदासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असणार आहे. मतदानासाठी एकूण ७ बुथ लावण्यात येणार असून, यातील १ ते ३ क्रमांकांच्या बुथवर आजीव सभासदांच्या मतदानाची सोय करण्यात येणार आहे. तर ४ ते ७ क्रमांकांच्या बुथवर सर्वसाधारण सभासदांना मतदान करता येणार आहे. प्रत्येक बुथवर सुमारे ५०० मतदारांना मतदान करण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे, तर मतमोजणीसाठी ७ ते १० टेबल लावण्यात येणार असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भणगे यांनी सांगितले. (प्र्रतिनिधी)