यंदा होणार सावानाचा शिक्षक गौरव पुरस्कार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:19 AM2021-09-12T04:19:03+5:302021-09-12T04:19:03+5:30
नाशिक : नागरिक शिक्षक गौरव समिती, सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यावतीने दरवर्षी शिक्षक गौरव समारंभ सप्टेंबर महिन्यात होतात. मात्र, कोरोना ...
नाशिक : नागरिक शिक्षक गौरव समिती, सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यावतीने दरवर्षी शिक्षक गौरव समारंभ सप्टेंबर महिन्यात होतात. मात्र, कोरोना महामारीमुळे ते गतवर्षी होऊ शकले नाहीत. मात्र, कविवर्य कुसुमाग्रजांनी सुरु केलेली परंपरा खंडित न होता कायम राहावी, यासाठी विलंबाने का होईना समारंभ करण्याचे निश्चित झाले असून, त्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच क्रीडा, कला, शास्त्रीय संगीत, संत साहित्याचे अभ्यासक, सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक अशा विविध क्षेत्रात वैशिष्टपूर्ण कामगिरी करणाऱ्या शिक्षकांनी यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन नागरिक शिक्षक गौरव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. यशवंतराव पाटील, सार्वजनिक वाचनालयांचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी केले आहे. गतवर्षी ज्यांनी पुरस्कारासाठी (२०१९-२०) अर्ज केले असतील, त्यांनी यावर्षी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मागील वर्षीचे अर्ज निवड समितीकडे पाठवले जाणार आहेत तसेच ज्या शिक्षकांना मागील वर्षी अर्ज सादर करता आले नाहीत, त्यांनी यावर्षी अर्ज करावेत, असेही आवाहन नागरिक शिक्षक गौरव समिती व सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने करण्यात आले आहे.
इन्फो
पुरस्कार संख्येत वाढ
यावर्षी गुणवंत शिक्षकांनी आपले प्रस्ताव स्वतंत्रपणे सादर करावेत. नाशिक महानगरपालिका हद्दीतील शिक्षकांसाठी गत ५० वर्षांपासून पुरस्कार सुरु असून, यावर्षी पुरस्कारांच्या संख्येत वाढ केली आहे. नव्याने मुख्याध्यापक, चित्रकला शिक्षक, संशोधक, व्यावसायिक अभ्यासक्रम या क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्या शिक्षकांना प्रस्ताव पाठवायचे असतील, त्यांनी अर्ज सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यालयातून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.